मशरूमच्या रसाचं इंजेक्शन टोचलं, तरुणाच्या धमन्यांत मशरूम उगवायला लागले

अमेरिकेतील नेब्रास्का भागातील 30 वर्षांच्या एका माणसाने मशरूमचा रस काढून तो स्वत:ला इंजेक्शनने टोचला.  इंजेक्शन टोचल्यानंतर त्याला थोडावेळाने त्रास व्हायला लागला.  त्याचे अवयव निकामी व्हायला लागले.  या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न करत उपचार केले आणि मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं . मात्र या तरुणाला उरलेलं आयुष्य बुरशीजन्य रोगविरोधी औषधांच्या सहाय्याने जगावं लागणार आहे.

पॉल (बदलेलं नाव) याला दुभंग व्यक्तिमत्वाचा त्रास होता.  या मानसिक आजारामुळे तो सतत नैराश्याने घेरलेला राहात होता.  यावर उपाय म्हणून त्याला डॉक्टरांनी सायकेडेलिक मशरूम खाण्याचा सल्ला दिला होता. या मशरूममधील सायलोसायबिन हा घटक डोकं शांत ठेवण्यास मदत करतो.  पॉलने हे मशरूम पाण्यात भरपूर वेळ उकळले आणि हे पाणी गाळून ते इंजेक्शनद्वारे स्वत:ला टोचून घेतले.  पुढचे दोन दिवस त्याला भयंकर अस्वस्थता जाणवायला लागली होती. रक्ताच्या उलट्या होत असतानाच त्याला कावीळ झाली आणि हगवण लागली.  त्याची प्रकृती खालावायला लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.  डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

डॉक्टरांना तपासणीदरम्यान दिसलं की पॉलच्या धमन्यांमध्ये मशरूम उगवायला लागले आहे.  तपासणीदरम्यान डॉक्टरांना दिसून आलं की त्याच्या यकृताला चिरा पडल्या असून त्याचे एकएक अवयव निकामी व्हायला सुरुवात झाली आहे.  डॉक्टरांनी त्याला व्हेंटीलेटर वर ठेवून उपचाराला सुरुवात केली.  पॉलच्या शरिरातील रक्तामध्ये भिनलेली विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना 22 दिवस लागले.  त्यानंतर पॉलची प्रकृती काहीशी सुधारली असून त्याला उर्वरीत आयुष्य हे बुरशीजन्यरोग विरोधी औषधे खाऊनच जगावं लागणार आहे.  आजतकच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली आहे.

सायकेडेलिक मशरूम खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो याबाबतचा एक अहवाल जर्नल ऑफ द अकॅडमी ऑफ कन्सल्शटेशन लायसन सायकेट्रीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.  ज्या डॉक्टरांनी पॉलवर इलाज केले त्यातील एका डॉक्टरने म्हटलंय की पॉलला पहिल्या स्टेजचा दुभंग व्यक्तिमत्वाचा मानसिक आजार होता. या आजाराने त्रस्त रोगी कधीकधी अचानक हिंसक होतो तर कधीकधी अचानक शांत होतो.  यावर उपाय म्हणून त्याला हे मशरूम खायला सांगितले होते.  सायकेडेलिक मशरूमला मॅजिक मशरूमही म्हणतात. नैराश्य आणि अधीरेपणा कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.  मात्र हे मशरूम किती आणि केव्हा खावे याचं प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे.  मात्र याचा विचार न करता पॉलने मशरूम पाण्यात उकळून त्या पाण्याचं स्वत:ला इंजेक्शन टोचून घेतलं होतं.  सायलोसायबीन पासून बनलेलं औषध इंजेक्शनवाटे कधीही टोचलं जात नाही.  हे मशरूम उकडून खायचे असतात त्याची पावडर किंवा पाण्यात उकळून ते पाणी पिणं जीवघेणं ठरू शकतं.   यामुळे हे मशरूम सल्ल्यानुसारच खावेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या