बिल जास्त येतं म्हणून घरातले बल्ब काढायची, सासऱ्याने केला सुनेचा खून

42

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

विजेचं बिल जास्त येतं असं म्हणत सासऱ्याने तक्रार केली. या तक्रारीनंतर त्याच्या सुनेने संध्याकाळी घरातले सगळे बल्ब काढून टाकायला सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या सासऱ्याने सुनेचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर सासऱ्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

भगत राम (वय-65 वर्ष) त्याची बायको आणि सुनेसोबत पहाडगंज भागात राहात होता. सून नीरजा देवी हिचा दहा वर्षांचा मुलगाही त्या घरात राहात होता. भगत राम यांचा मुलगा दर्शन आणि नीरजाने घटस्फोटासाठी अर्ज केला असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दर्शन या वादामुळे घरच्यांपासून वेगळा राहात होता. मुलगा वेगळा राहात असल्याने भगत राम त्याच्यावर नाराज होते. भगत राम आणि नीरजा देवी यांचं सातत्याने भांडण होत होतं. एके दिवशी भगत राम याने महिन्याचं विजेचं बिल 6 हजार रुपये आल्याचं म्हणत वीज कमी वापर असं नीरजाला सांगितलं.

सासऱ्याने खडसावल्याने नीरजा वैतागली होती. नीरजाने रोज संध्याकाळी घरातले सगळे बल्ब काढून ठेवायला सुरुवात केली. यामुळे भगत राम यांचा तोल सुटला आणि त्यांनी नीरजाशी भांडायला सुरुवात केली. वाद एवढा वाढला की भगत राम यांनी भाजी कापायची सुरी घेतली आणि नीरजाचा गळा कापला. भगत राम यांनी पोलिसांकडे जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये भगत राम यांनी सांगितले की त्यांची सून त्यांना आणि त्यांच्या बायकोला प्रचंड त्रास द्यायची. बल्ब काढून ठेवत असल्याने या वृद्ध दांपत्याला अंधारात काम करावं लागत होतं. हा त्रास सहन न झाल्याने त्यांनी नीरजाचा खून केला असं भगत राम यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या