भयानक! 10 वर्षांच्या मुलीसमोरच वडिलांनी गळा आवळून केली आईची हत्या

14


सामना ऑनलाईन । पिंपरी

पिंपरीतल्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाटी येथे वडिलांनी त्याच्या 10 वर्षीय मुलीसमोरच आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तम जाधव (36) असे या नराधम पित्याचे नाव असून त्याने पत्नी वंदना जाधवची वायरने गळा आवळून हत्या केल्याचे धक्कादायक कहाणी तिच्या मामाला सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी पुंडलिक वाघमारे यांच्या फिर्यादीवरून उत्तम जाधव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

“पप्पाने दारू पिऊन भांडण केले आणि आईला व आम्हाला मारले. आम्ही जेवत असताा आमची जेवणाची ताटंही पप्पांनी फेकून दिली आम्हाला जेवू दिले नाही. रात्री निळ्या रंगाच्या वायरने पप्पाने आईचा गळा आवळला. आई बेशुद्ध पडल्यावर तिला पप्पांनी उचलून मोरीत टाकले आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला”. अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना 10 वर्षांच्या चिमुकलीने तिच्या मामाला सांगितली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम जाधव हा पत्नी वंदना आणि मुलांना दारू पिऊन नेहमी मारहाण करायचा. उत्तम जाधव आणि वंदनाला ओंकार (8) आणि दीपाली (10) अशी दोन मुलं आहेत. बुधवारी उत्तमने दारू पिऊन पत्नी आणि मुलांना मारहाण केली. तसेच रात्री पत्निची वायरने गळा आवळून हत्या केली. उत्तम आणि वंदनाचे भांडण झाल्याची माहिती तिचा मामा पुंडलिक वाघमारे यांना मिळताच त्याने तत्काळ वंदनाच्या घरी धाव घेतली. त्यावेळी वंदना मोरीतच पडलेली होती व उत्तम घरातून पसार झाला होता. हा भयंकर प्रकार बघून भयभीत झालेल्या दीपालीने संपूर्ण प्रकार तिच्या मामाला सांगितला. मामाने वंदनाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तम जाधववर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या