पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या, उरणमधील खळबळजनक घटना

murder-knife

पत्नीचा खून करून नवऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना बुधवार ता.21 रोजी उरण तालुक्यातील जासई येथे घडली. खून झालेल्या पत्नीचे नाव किरणदेवी राजुकुमार राय (28) आणि आत्महत्या केलेल्या पतीचे नाव राजुकुमार रामेश्वर राय (31) असे आहे. राजुकुमारने पत्नी किरणदेवी हीचा तीन लहान मुलींसमोर गुळा चिरून खून केला आणि स्वतः आत्महत्या केली. हे दोघेही मुळचे राहणार बिहार येथिल असून राजूकुमार राय हा जासई येथे टिआयपीएल कंपनीत सुपरवायझरची नोकरी करत होता. 20 दिवसांपूर्वी त्याने आपली पत्नी किरणदेवी आणि तीन मुलींना बिहारवरून जासई येथे आणले होते.

मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना जासई रांजणपाडा येथे एका इसमाने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचा फोन आला होता. पोलिसांनी ताबडतोब तीथे जावून बॉडी ताब्यात घेतली.  त्याच्याकडील मिळालेल्या पत्त्यावरून तपास करताना बुधवार ता.21 रोजी त्याच्या घरी गेले असता तो राहत असलेल्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे दिसले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले तेव्हा त्यांना हृदय पिळवटून टाकणारे दृष्य़ दिसले. घरात किरणदेवी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि रक्ताने माखलेल्या तिच्या तीन लहान मुली तिच्या अंगावर झोपलेल्या होत्या. हे दृश्य बघितल्यानंतर पोलिसांसह शेजाऱ्यांचे देखिल मन हेलावून गेले. या तीन लहान मुलींना शेजाऱ्यांच्या येथे आंघोळ घालून त्याना नवी मुंबई येथे बाल संगोपन गृहात पाठविण्यात आले आहे.

पत्नीचा खून केल्यानंतर पतीने रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कर्जबाजारी पणा, तीन मुलींचे संगोपन किंवा पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचे उरणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांनी सांगितले. पत्नीचे शवविच्छेदन केले तेव्हा ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर पती राजुकूमार याने रेल्वेखाली उडी मारल्यामुळे त्याचे दोन्ही पाय तुटले असून शरिर छिन्न विछिन्ह झाले आहे. त्यांचे नातेवाईक बिहार वरून आल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा पोलिस निरिक्षक अतुल आहेर हे अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या