सैन्यात मेजर आहे सांगून 17 जणींना 6 कोटींचा गंडा! ठग निघाला नववी पास

सैन्यात मेजर असल्याची बतावणी करून 17 जणींशी लग्न करण्याच्या नावावर त्यांना फसवणाऱ्याला लखोबा लोखंडेला बेड्या पडल्या आहेत. हैदराबाद येथे ही घटना घडल्याचं वृत्त आहे.

काय आहे प्रकरण

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या आरोपीचं नाव मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान असं आहे. हा 42 वर्षांचा आरोपी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातल्या केल्लमपल्ली गावचा रहिवासी आहे. त्याला एक पत्नी आणि मुलगाही आहे. त्याचं कुटुंब आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात राहतं. पण, तो काही काळापूर्वी आपल्या कुटुंबाला सोडून हैदराबाद येथील जवाहर नगरातील सैनिकपुरी येथे आला.

जन्मतारीख बदलून आधारकार्ड बनवलं

तिथे आल्यावर त्याने आपली मूळ जन्मतारीख 12-07-1979 ही बदलून 27-7-1986 केली आणि त्यानुसार श्रीनिवास चौहान या खोट्या नावाने एक आधारकार्ड बनवून घेतलं. त्या दरम्यान त्याने आपल्या कुटुंबाला हिंदुस्थानी सैन्यात नोकरी मिळाल्याची थाप मारली आणि आपण मेजर बनल्याचं सांगितलं.

आधारकार्डाचं काम झाल्यावर तो वरवधु संशोधक किंवा ओळखीच्या व्यक्तिंना सांगून आपल्यासाठी वधु संशोधन सुरू केलं. नवऱ्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्याने सराईतपणे थापा मारायला सुरुवात केली. सैन्याचं नकली आयडी कार्ड, फोटो आणि खोट्या पिस्तुलाला दाखवून मधुवथ त्यांचा विश्वास संपादन करत असे. तो स्वतः पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा पदवीधर असल्याचंही सांगत असे.

कोट्यवधींची कमाई

कुटुंबांचा विश्वास बसल्यानंतर मधुवथ त्या तरुणींकडून पैशाची मागणी करत असे. पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क बंद करून टाकत असे. अशा प्रकारे त्याने 17 जणींना फसवलं आहे. मिळालेल्या पैशातून त्याने एक घर, तीन गाड्या आणि अन्य ऐशोआरामाची साधनं विकत घेतली होती. त्यांची किंमत तब्बल साडे सहा कोटी इतकी आहे.

निघाला नववी पास

शनिवारी पोलिसांनी तक्रारीवरून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी करताना त्याने मारलेल्या थापा उघड झाल्या. तसंच त्याचं शिक्षणही अवघं नववी पास इतकंच असल्यांचही पोलीस चौकशीत उघड झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या