आर्थिक तंगीमळे वडिलांनी आत्महत्या केली, बाबा जिवंत असल्याचं समजून 3 दिवस मृतदेहाकडे खायला मागत होती मुले

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बरेलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर पुढचे 2 दिवस या व्यक्तीच्या लटकत असलेल्या मृतदेहाकडे त्याची दोन मुले जेवण मागत होती.

आपला बाबा आपल्याशी बोलत का नाही, आपल्याला जेवण का देत नाही हे या मुलांना कळतच नव्हतं. अखेर भूक असह्य झाल्याने या मुलांनी शेजारच्यांकडे खायला मागितलं. आपले बाबा खायला देत नसल्याचं सांगितल्याने या मुलांच्या शेजारी राहणाऱ्यांनी घरात डोकावलं, तेव्हा या प्रकाराचा उलगडा झाला. मनोजच्या मुलाचं वय 6 वर्ष असून त्याच्या लहान बहिणीचं वय 4 वर्ष आहे.

मनोज दयाळ हा 32 वर्षांचा तरुण नोएडा इथे नोकरीला होता. लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली होती आणि घरात आर्थिक संकट निर्माण झालं. पैशांच्या चणचणीमुळे नवरा-बायकोत वाद व्हायला लागले होते. या वादामुळे मनोजची बायको गुरुवारी घर सोडून माहेरी निघून गेली होती. मनोजची दोन्ही मुलं त्याच्यासोबत होती. पोलिसांनी सांगितलं की मनोजने आत्महत्या केल्यानंतर भुकेने कळवळणारी ही मुलं त्याच्या मृतदेहाशीच बोलत होती. आम्हाला भूक लागलीय, खायला द्या ना! असं ती मनोजच्या मृतदेहाला सांगत होती. अनेकदा सांगूनही बाबा खायला देत नसल्याने मुलांनी शेजारच्यांकडे खायला मागितलं होतं. यानंतर शेजारच्यांनी जेव्हा मनोजच्या घरात डोकावलं तेव्हा त्याचा मृतदेह छताला लटकलेला दिसला. मृतदेह सडायला लागल्याने दुर्गंधी येत होती, ज्यामुळे शेजारच्यांनी त्याच्या मृतदेहाला हात लावला नाही.

शेजारपाजारच्यांनी पोलिसांना मनोजने आत्महत्या केल्याचं कळवलं होतं. यानंतर पोलिसांनी मनोजचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षत रोहित सजवान यांनी सांगितले की मनोजचा मृत्यू गळफास लागल्यानेच झाला होता आणि दोन दिवसांपूर्वी त्याचे प्राण गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या