जिओ पाणीपुरी! पाणीपुरी शौकिनांसाठी विक्रेत्याची खास ऑफर

सामना ऑनलाईन । पोरबंदर

पाणीपुरी म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी असे असंख्य प्रकार… अशा या पाणीपुरीचा आस्वाद घेणे कोणाला आवडणार नाही आणि ते ही थोड्या पैशात. आश्यर्य वाटले ना. गुजरातच्या एका पाणापुरीवाल्याने जिओच्या मोफत ऑफरपासून प्रेरित होत १०० रुपयांमध्ये अमर्यादीत पाणीपुरी खाण्याची ऑफर सुरू केली आहे. जर तुम्ही पट्टीचे खवय्ये असाल तर तुम्ही गुजरातमधील पोरबंदर येथे जाऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

रवी  जगदंबा असे या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. रवीकडे पाणीपुरी शौकिनांसाठी एक एकदिवसीय आणि एक मासिक अशा दोन ऑफर आहेत. पहिल्या ऑफरमध्ये तुम्हाला १०० रुपयांत एका दिवसासाठी अमर्यादित पाणीपुरी खाण्याची मुभा असेल, तर दुसऱ्या ऑफरमध्ये १ हजार रुपयांत महिनाभर हवी तेवढी पाणीपुरी खाण्याचा आस्वाद घेता येणार आहे.

याबाबत रवीला विचारले असता, ही कल्पना आपण जिओपासून प्रेरित होऊन राबवली असल्याचे रवीने सांगितले. तसेच या ऑफरवर पाणीपुरी शौकिनांची उडी पडत असल्याचेही रवी म्हणाला.