बोंबला! बिस्कीट समजून शेणाच्या गोवऱ्या ऑर्डर केल्या अन् चाखल्याही, रिव्ह्यू व्हायरल

अमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून अनेक लोक वेगवेगळ्या वस्तू, खाद्यपदार्थ ऑर्डर करत असतात. या वस्तू वापरल्यानंतर ग्राहक त्याबाबत आपला रिव्ह्यू येथे पोस्ट करत असतात. सध्या अशाच एका ग्राहकाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वाचणारेही कपाळाला हात मारून घेत आहेत.

शेणाच्या गोवऱ्या या मुख्यत्वे पुजा-पाठ, होम-हवण करण्यासाठी किंवा ग्रामिण भागामध्ये चूल पेटवण्यासाठी किंवा वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. परंतु एका व्यक्तीने या शेणाच्या गोवऱ्यांचा वापर खाण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने अमेझॉनवरून बिस्किट समजून शेणाच्या गोवऱ्या ऑर्डर केल्या. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने त्या खाल्ल्या देखील आणि खाल्ल्यानंतर त्याने रिव्ह्यू देखील दिला. हा रिव्ह्यू संजय अरोडा नावाच्या एका डॉक्टरने ट्विटरवर शेअर केला आहे.

cow-dung-1

रिव्ह्यूमध्ये ग्राहकाने नमूद केले की, ‘याची चव अत्यंत खराब आहे. जेव्हा मी याचा घास खाल्ला तेव्हा गवत आणि मातसारखी याची चव लागली. यानंतर मला जुलाबाचा त्रास झाला. याचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीला माझे निवेदन आहे की पदार्थ बनवताना साफ-सफाईकडे लक्ष द्या. तसेच याची चव आणि कुरकुरीतपणा याकडेही लक्ष्य द्या.’

cow-dung-amazon

दरम्यान, अमेझॉनने या शेणाच्या गोवऱ्यांची खास जाहिरातही केली होती. शुद्ध 100 टक्के गाईच्या शेणापासून बनवलेल्या या गोवऱ्या असून पुजा-अर्जा, होम-हवन यासाठी वापरता येतात. 12 गोवऱ्यांचे हे पाकिट असून 5 इंचांच्या या गोवऱ्या आहेत. एवढी स्पष्ट माहिती देण्यात आलेली असतानाही ग्राहकाने या गोवऱ्या बिस्किट समजून कशा ऑर्डर केल्या याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या