उत्तर प्रदेशात आणखी एक हादरवणारी बलात्काराची घटना, बापाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गर्भवती

उत्तर प्रदेशात लैंगिक छळाच्या क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या एकामागोमाग एक घटना समोर येत आहेत. यात भर पडलीय ती फतेहपूर इथल्या घटनेची. बाराबांकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. एकदा नाही तर बापाने आपल्यावर अनेकदा बलात्कार केला असल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे. सततच्या बलात्कारामुळे ही मुलगी गर्भवती राहिली आहे

फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावामध्ये ही मुलगी आपल्या बापासोबत राहात होती. मुलीचे वय अंदाजे 16 वर्ष असावे असे पोलिसांनी सांगितले आहे. मंगळवारी या मुलीच्या पोटात दुखायला लागलं होतं. मुलीची आई दोन वर्षांपूर्वी दगावली असल्या कारणाने त्यांच्या घरात कोणीच महिला सदस्य नव्हतं. या मुलीने तिच्या आत्याला पोटात दुखत असल्याचं सांगितलं. आत्या तिच्या घरी गेली आणि तिने तिची विचारपूस केली असता तिला सगळा प्रकार कळाला. तिने मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेलं. बुधवारी या मुलीने बाळाला जन्म दिला मात्र हे बाळ जन्मापूर्वीच दगावलं होतं. पोलिसांनी या अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनेच्या चौकशीला सुरुवात केली.

पोलिसांना चौकशी दरम्यान कळालं आहे की या बायको दगावल्यानंतर तिच्या नवऱ्याची वाईट नजर पोटच्या मुलीवर पडली होती. त्याने गेल्या वर्षभरापासून मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. अत्याचाराबद्दल कोणाला सांगितलंस तर ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली होती. आई गमावली आता बापही गमावू या भीतीने ही मुलगी गुपचूप अत्याचार सहन करत होती. मंगळवारी आत्याने चौकशी केल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. या मुलीचा बाप हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे, त्याला काही गुन्ह्यात शिक्षा झाली असून तो तुरुंगवास भोगून आलेला आहे. आरोपीला एकूण 7 मुलं आहे. आठव्या बाळाला जन्म देत असताना त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हाथरसमधल्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरूणीवर अमानुष सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणामुळे अवघा देश सुन्न झाला असतानाच पोलिसांनी मध्यरात्रीच्या अंधारात पिडीतेवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. पीडीतेच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलीचा चेहरा पाहता आला नाही. उत्तरप्रदेश पोलिसांच्या भयंकर कृत्यामुळे सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी हाथरस जवळील गावात पिडित 19 वर्षीय दलित तरूणीवर चार नराधमांनी बलात्कार केला. तीने नावे उघड करू नये म्हणून तीची जीभ छाटली. मणका, पाठीचा कणाही मोडला. अत्यंत क्रुर पद्धतीने अत्याचार केले. मात्र, उत्तरप्रदेश पोलिसांनी आठ दिवस गुन्हाही नोंदविला नाही. मिडियात अत्याचाराचे वृत्त आल्यानंतर चार नराधमांना अटक केली. पिडीत तरूणीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी हालविण्यात आले. तिचा मंगळवारी मृत्यू झाला.

पार्थिव घरी आणले नाही
पिडीत तरुणीचे पार्थिव रात्रीच दिल्लीतून हलविण्यात आले. आपल्या बहिणीचे पार्थिव घरी आणावे अशी विनंती तिच्या भावाने केली पण पोलिसांनी ऐकले नाही. माझ्या वडिलांना जबरदस्तीने पोलीस घेऊन गेले. मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. त्यावेळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत होते. माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही असा आक्रोश तिच्या आई-वडिलांनी केला आहे. दरम्यान, हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर यांनी आरोप फेटाळले आहेत. कुटुंबाच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे पिडीतेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील आणि गावातील काही लोक उपस्थित होते, असा त्यांनी दावा केला आहे.

आक्रोश… संताप
पिडीत तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच उत्तरप्रदेशसह देशभरात प्रचंड खळबळ उडाली. राजधानी दिल्लीसह सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. नराधमांना फाशी द्या अशी मागणी होत आहे.
हाथरस आणि परिसरातील नागरिकांनी पिडीतेच्या गावात धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री जबरदस्तीने का अंत्यसंस्कार केले? कोणते पुरावे नष्ट करायचे होते असे प्रश्न जनता विचारत आहे.

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेतली असून, माझ्याशी फोनवर संवाद साधला. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटद्वारे दिली.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे.

तुम्ही कसले मुख्यमंत्री? राजीनामा द्या – प्रियंका गांधी-वढेरा
पिडीतेच्या पार्थिवावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिले? कुठपर्यंत हे असे चालणार आहे? तुम्ही कसले मुख्यमंत्री आहात? राजीनामा द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवी मृत्यूनंतरही मानवी हक्कांची पायमल्ली तुमचे सरकार करीत आहे. मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा योगी आदित्यनाथ यांना अधिकार नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी- मायावती
रात्रीच्या अंधारात ज्या पद्धतीने पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ते पाहता अनेक शंका उपस्थितीत होत आहेत. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणाची दखल घेवून पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिडित तरुणीच्या वडिलांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि कुटुंबियांना 25 लाखांची मदत, एका सदस्याला सरकारी नोकरी आणि हाथरस शहरात घर देऊ, असे आश्वासन दिले.हाथरसमध्ये वाल्मिकी समाजाच्या सफाई मजदूर संघाने काम बंद आंदोलन पुकारले. तर संतप्त जनतेने काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक केली.

आपली प्रतिक्रिया द्या