यकृताचा तुकडा देऊन वडिलांनी वाचवले 8 महिन्यांच्या बाळाचे प्राण

‘बिलिअरी अॅट्रेसिया’ या यकृताच्या विकाराने ग्रस्त अलेल्या बाळावर एक दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. या विकारामुळे बाळाचं यकृत आणि त्यातील पेशी खराब व्हायला लागल्या होत्या. यामुळे त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. तब्बल 11 तास या बाळावर शस्त्रक्रिया चालली होती. या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्वत:च्या यकृताचा तुकडा दान केला होता.

‘बिलिअरी अॅट्रेसिया’ या विकारात यकृतातून स्रवणाऱ्या पित्तरसाच्या प्रवाहात अडथळे येतात. त्यामुळे यकृत व त्याच्या पेशी खराब होतात. ओजस राऊळ याला हा विकार झाला होता.त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं बनलं होतं. यकृत निकामी झाल्याने ओजसच्या शरिरातील रक्त गोठण्याची क्षमता कमी झाली होती. त्याचे वजन अतिशय कमी झाले होते. ओजसच्या जन्मानंतर त्याची त्वचा पिवळी पडत चालल्याचं त्याच्या आईवडिलांना दिसून आलं होतं. नवजात अर्भकांमध्ये 12 हजारांत एकाला हा दुर्मिळ स्वरुपाचा आजार होत असतो असं कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे डॉ. सोमनाथ चटोपाध्याय यांनी सांगितले. ओजस 2 महिन्यांचा असताना त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याला कावीळ झाली आणि पोटात पाणी जमा व्हायला लागून त्याच्या शौचातून रक्त जाऊ लागले. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आणल्यानंतर त्याचे यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांना कळाले होते. असल्याचे निदान झाले व त्याच्यावर ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ची शस्त्रक्रिया करण्यात आली.”

ओजसवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली, यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांच्या यकृताचा 25 टक्के भाग दान केला. हा भाग ओजसच्या शरीरात बसविण्यात आला व रक्तवाहिन्यांना जोडण्यात आला. या अवघड शस्त्रक्रियेनंतर ओजसच्या वडिलांना 5 दिवसांनी तर ओजसला 15 दिवसांनी घरी सोडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या