भाईंदरमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीवर जीवघेणा हल्ला

36

सामना ऑनलाईन । भाईंदर

भाईंदर येथे एका शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विनोद कश्यप या २४ वर्षीय तरूणाला अटक केली आहे.

विनोद हा गेल्या काही महिन्यापासून पिडीत मुलीला प्रेमाची मागणी घालत होता. पण ती त्याला नकार देत होती. तरिही तो सतत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. तिचा सतत पाठलागही करायचा. मुलीने याबाबत तिच्या घरीही सांगितले होते. गुरूवारी दुपारी सदर मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली. ती घाबरलेली असल्याने तिची आई तिला शाळेत सोडायला आली होती. शाळेत जाण्याच्या मार्गावर असलेल्या भुयारी मार्गात त्या दोघी गेल्या त्यावेळी विनोदने तेथे येऊन त्या मुलीच्या पोटात सुरा खुपसला. त्या मुलीच्या आईने आरडाओरड करून मदत मागितली पण तो भुयारी मार्ग नवीन असल्याने तेथे फार वर्दळ नव्हती.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ स्थानिक रूग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर तिला कांदिवलीच्या सुश्रुषा रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. याप्रकरणी त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलिसांनी विनोदला भाईंदर येथून अटक केली आहे. विनोदवर पोक्सो कायद्याअंतर्गत हत्येचा प्रयत्न व विनयभंग असे गुन्हे दाखल केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या