कर्ज फेडण्यासाठी 25 लाखांच्या सोन्याचा अपहार,पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पंजाबमध्ये लपला

दहिसर येथील एका ज्वेलर्सचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या सोने कारागीराला दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मीनाझुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो पंजाबच्या जालंदर येथे सहा महिन्यांपासून राहत होता. त्याने ते सोने पंजाब येथे एकाला विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.

मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मीनाझुद्दीन शेख हा गेल्या 18 वर्षांपासून सोने कारागीर म्हणून काम करतो. तो दहिसर पूर्व येथे भाडय़ाच्या घरात दागिने बनवण्याचे काम करायचा. त्याच्याकडे अनेक ज्वेलर्स हे दागिने बनवण्यासाठी देत असायचे. लॉकडाऊन काळात मीनाझुद्दिनने काही कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड तो करू शकला नव्हता. त्यामुळे त्याने सोन्याचा अपहार करण्याचा कट रचला. गेल्या वर्षी दहिसर येथील एका ज्वेलर्सने मीनाझुद्दीनला 25 लाखांचे सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. लवकरच सोन्याचे दागिने बनवून देतो असे त्याने एका ज्वेलर्सला सांगितले. त्याच रात्री मिनाझुद्दिनने आपल्या कुटुंबीयांना घेऊन पळ काढला. ठरल्यानुसार ज्वेर्ल्सने मीनाझुद्दीनला सोन्यासाठी पह्न केला असता त्याचा पह्न बंद होता. त्यानंतर ज्वेलर्स हे मिनाझुद्दिनच्या घरी गेले असता त्याच्या घराला टाळे होते. 25 लाखांच्या सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी ज्वेलर्सने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ज्वेर्ल्सच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, जाधव, किणी, सांबरेकर, पांगे आदी पथकाने तपास सुरू केला. गेल्या सात महिन्यांपासून पोलीस मीनाझुद्दिनचा शोध घेत होते. तो पंजाबला असल्याचे समजताच तोटावार यांचे पथक पंजाबच्या जालिंदर येथे गेले. तेथून पोलिसांनी मीनाझुद्दीनला अटक करून मुंबईत आणले. त्याने ते सोने त्याच्या भावाच्या मदतीने विकल्याचे समोर आले. मीनाझुद्दीनला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

पत्नीचे एटीएम कार्ड वापरले

सोन्याचा अपहार केल्यानंतर मीनाझुद्दीनने मोबाईल नंबर बदलला. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीच्या एटीएममधून काही रक्कम काढली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. तसेच त्याच्या पत्नीच्या खात्यात ई वॉलेटमधून काही रक्कम आली होती. त्यावरून पोलिसांनी मिनाझुद्दिनची माहिती काढली. एटीएममध्ये सीसीटीव्ही पोलिसाना मिळाले. त्यानंतर पोलिसांचे पथक जालंदर येथे गेले. तेथून मीनाझुद्दिनला अटक करून मुंबईत आणले.