सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

797
प्रातिनिधिक

श्रीगोंदा तालुक्यात सध्या सावकारांचे पेव सुटले आहे. अशाच एका सावकाऱाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्ता गणपत सुतार (35) असे त्या तरुणाचे नाव असून तो शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून उपजीविका करत होता.

दत्ता याने काही खाजगी सावकारांकडून त्याने आठवड्याला 10 टक्के या दराने कर्ज घेतले होते.अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते वेळेवर फेडता येत नव्हते. सतत सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी देई व शिवीगाळ करत असत. या प्रकारामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. सावकारांचा त्रास असह्य झाल्याने त्याने बुधवार राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला तेथून पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचार चालू असतानाच शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.त्याच्या पाठीमागे पत्नी नऊ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना हेरून मध्यस्थमार्फत हे सावकार संपर्क साधतात. अडचण किती महत्त्वाची आहे हे पाहून व्याजाचा दर ठरवला जातो. आठ दिवसांसाठी लागणाऱ्या पैशाला 10 ते 15 टक्के व्याजदर ठरवला जातो. त्यामुळे वेळेवर पैसे न फेडल्यास अल्पावधीतच रक्कम दुप्पट तिप्पट होते. रकमेचा बोजा वाढल्याने सर्वसामान्यांना फेडणे मुश्किल होते.

आपली प्रतिक्रिया द्या