मोदींनी पाठवले साडे पाच लाख रुपये! पैसे परत न केल्याने पोलिसांकडून अटक

बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या खात्यात बँकेने चुकून साडे पाच लाख रुपये जमा केले होते. हे पैसे पंतप्रधान मोदींनी पाठवले असा त्या व्यक्तीचा समज झाला. परंतु बँकेने त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने नकार दिला. अखेर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जर काळा पैसा आणला तर प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होऊ शकतात असे वक्तव्य केले होते.

बिहारमध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक आहे. या बँकेत रणजीत दास या शिक्षकाचे खाते आहे. दास यांच्या खात्यात गेल्या वर्षी साडे पाच लाख रुपये जमा झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्यानुसार खात्यात पैसे जमा झाले असा गैरसमज दास यांना झाला. नंतर बँकेला ही चूक लक्षात आली. बँकेच्या मॅनेजरने तत्काळ दास यांना पैसे जमा करण्यास सांगितले. परंतु दास यांनी पैसे परत देण्यास नकार दिला.

आपल्या खात्यात मोदींनी पैसे टाकले असावे असे दास यांनी सांगितले. तसेच माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे एकदम एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने मी खूप खुश होतो असे दास यांनी सांगितले. बँकेने दास यांना सहा नोटीस पाठवल्या. तरी दास यांनी रक्कम जमा केली नाही.

अखेर बँकेच्या मॅनेजरने पोलिसांकडे धाव घेतली आणि दास यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.

दास यांनी आतापर्यंत साडे तीन लाख रुपये बँकेला परत केल्याचे सांगण्यात येत आहे. दास यांनी रक्कम खर्च केली आणि ती परत देणे शक्य नसल्याचे सांगितले होते. म्हणून पोलिसांनी दास यांना अटक केली. जर दास यांच्यावरील गुन्हा कोर्टात सिद्ध झाला तर त्यांना तीन वर्षाची कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकतो अशी माहिती एका वकीलाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या