नवविवाहितेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश द्रव्य फेकले, पर्वतीतील घटनेने खळबळ

मैत्रिणीच्या विवाहानंतर तिला भेटण्यास बोलवून वाद घालत चेहऱ्यावर अ‍ॅसिडसारखे द्रव्य टाकून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना काल रात्री अकराच्या सुमारास पर्वती दर्शन परिसरातील भांबरे शाळेजवळ घडली.

त्यामुळे नवविवाहिता जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती) याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 18 वर्षीय नवविवाहितेने फिर्याद दिली आहे.

 हल्लेखोर पीडितेच्या ओळखीचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी फिर्यादी तरुणी आणि अबुझर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी तरुणीचा विवाह झाला होता. त्यानंतर तरुणी तिच्या पतीसह माहेरी सुट्टीसाठी आली होती. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अबुझरने तिला भेटण्यासाठी पर्वती दर्शन परिसरात बोलावले.

दोघांमध्ये गप्पा झाल्यानंतर तरुणीने अबुझरला आता तु माझ्या मागे लागू नकोस, माझे लग्न झालेले आहे, असे समजावून  सांगत होत्या. त्याचा राग आल्यामुळे अबुझरने रागाच्या भरात तिच्याशी वाद घातला. ‘तुझे अपने आपपर गुरुर है ना, देख मै तेरा गुरुर तोड देता हु’, असे म्हणत तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसारखे द्रव्य फेकले. या हल्ल्यात नवविवाहिता जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी तत्काळ आरोपी अबुझरचा शोध घेऊन त्याला अटक केले. नवविवाहितेवर उपचार सुरू असून, नेमके अ‍ॅसिड टाकले की आणखी काही हे समजले नाही. डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती मिळेल असे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या