नागपूरात मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

55

सामना ऑनलाईन । नागपूर

मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच आता नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. निवासस्थानावरील सुरक्षारक्षकांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले त्यामुळे त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला. या व्यक्तीला व त्याच्यासोबत आलेल्या आणखी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

२००२ साली नागपूर महानगरपालीकेतील १०६ कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यातील ८९ कर्मचाऱ्यांना नोकरीवर परत घेण्यात आलं, पण उरलेल्या १७ जणांना अद्याप नोकरी मिळाली नाही. या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करुनंही त्यांना नोकरीवर घेण्यात आलं नाही, त्यामुळे आता त्यातील काही जणांनी नागपूरात आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या सर्वांनी आपल्याला नोकरीत पुन्हा घ्यावे अशी मागणी केली होती व तसे न केल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला होता.

रविवारी सकाळी नोकरीवरून काढून टाकलेले सातही जण सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पोहचले. त्यांनी मुख्यमंत्र्याविरोधात घोषणा देत आंदोलन सुरू केले मात्र त्याचवेळी त्यांच्यापैकी एकाने अचानक अंगावर रॉकेल ओतून घेतलं. मात्र, पोलिसांनी वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. याप्रकरणी अशोक देवगडे,मोहम्मद युसुफ, मोहम्मद याकुब, सुरेश बर्डे,विनायक पेंडके, गणपत बाराहाते आणि दीपक पोरकोडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या