पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न

सामना ऑनलाईन, मुंबई

घाटकोपरमधील एक सार्वजनिक शौचालय पालिका बिल्डरच्या फायद्यासाठी तोडत असल्याचा आरोप करीत एका तरुणाने पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुदाम शिंदे असे या आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील राम जोशी मार्ग येथे माता महाकाली सेवा मंडळ या ठिकाणी सरकारी मालकीच्या जागेकर 38 आसनी शौचालय आहे.  येथील एक हजार ते 1500 नागरिक या शौचालयाचा वापर करतात. विभागातील नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे. विभागातील लोकसंख्या लक्षात घेता आहे ते शौचालय नागरिकांना अपुरे पडते. या संदर्भात 4 वर्षांपासून आमरण उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा या लोकशाही पद्धतीने आंदोलन करूनही पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी तक्रार सुदाम शिंदे यांनी केली. शिंदे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे समजते.

असा आहे शिंदेंचा आरोप

पालिका ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे व परिमंडळ – 6 चे उपायुक्त ढाकणे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बिल्डर व अधिकारी यांच्या संगनमताने शौचालय तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. या आधी हे शौचालय चांगले असल्याचा अहवाल दिला असताना  सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे त्या अहवालाकडे दुर्लक्ष करून सर्व नियमांचे उल्लंघन करीत आहेत. शौचालय तोडून बिल्डरला त्या जागेवर इमारत बांधायची आहे असा आरोप सुदाम शिंदे यांनी केला आहे.