हत्तीबरोबर सेल्फी घेणं पडलं महाग

25
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। उडिसा

उडीसातील राऊरकेला येथे हत्ती बरोबर सेल्फी घेणं एका तरुणाला महागात पडल आहे. हत्तीबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला संतप्त हत्तीने अक्षरश; पायदळी तुडवलं. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अशोक असे या मृत तरुणाचे नाव आहे.

उडीसातील राऊरकेला भागात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. काही दिवसांपूर्वी अचानक काही हत्ती अशोकच्या गावात शिरले होते. गावातील घरे व शेतांची नासाडी करण्यास या हत्तींनी सुरुवात केली. यामुळे हत्तींना गावाबाहेर पिटाळण्यासाठी अनेक जण त्यांच्या मागे धावू लागले. एवढ्या मोठ्या संख्येने आलेला माणसांचा जमाव बघून हत्ती घाबरले व वाट दिसेल तिथे धावत सुटले. याच दरम्यान एक हत्ती शेतात घुसला. अशोक व त्याचे मित्रही त्याच्या मागे शेतात गेले. हत्ती एकटा असल्याचे बघून अशोकने त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. अशोकच्या मित्रांनी त्याला सेल्फी न काढण्याचा सल्ला दिला. पण अशोकने त्याकडे दुर्लक्ष केले व तो हत्तीच्या मागे फिरत राहीला. यामुळे चिडलेला हत्तीं अशोकवर धावून गेला. हत्ती अंगावर धावून येत असल्याचे बघून अशोकने पळायचा प्रयत्न केला. पण हत्तीने त्याला गाठलेच व सोंडेने उचलून जमिनीवर आपटले. पण तरीही त्याचे समाधान झाले नाही व त्याने अशोकला पायाखाली चिरडले. यात अशोकचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हत्ती शांतपणे आल्या मार्गी जंगलात निघून गेला.

आपली प्रतिक्रिया द्या