Man vs Wild – रजनीकांत यांच्या अटकेची जोरदार मागणी, शूटिंगविरोधात आवाज

3425
rajinikanth

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरील बेअर ग्रिल्सचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man vs Wild) या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे शूटिंग कर्नाटकच्या ‘बांदीपूर नॅशनल पार्क’ येथे करण्यात आले. मात्र याविरोधात प्राणीमित्रांनी आवाज उठवत थेट रजनीकांत यांच्या अटकेची मागणी केली आहे. रजनीकांत यांनी मात्र यावर अद्याप कोणतीही टिपण्णी केलेली नाही.

बेअर ग्रिल्सचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे 180 देशात प्रक्षेपण होते. या कार्यक्रमात याआधी पंतप्रधान मोदींसह जगभरातील दिग्गज राजकीय नेते आणि सुप्रसिद्ध कलाकारांनीही सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. ‘बांदीपूर नॅशनल पार्क’ येथे कार्यक्रमाचे शूटिंग पार पडले. मात्र प्राणीमित्रांना हे रुचले नसून त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

बांदीपूर नॅशनल पार्क हे व्याघ्र अभयारण्य आहे. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना इथे शूटिंग करण्यावर आक्षेप आहे. प्राणीमित्रांचे म्हणणे आहे की, अशा कार्यक्रमाच्या शूटिंगवेळी क्रू, सेट, उपकरणे यामुळे वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच सध्या इथे कोरडं हवामान आहे. अशा वातावरणात अभयारण्यात वणव्यांची शक्यता अधिक असते आणि त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते. म्हणून या काळात शूटिंग करण्यास प्राणीमित्र संघटना आणि कार्यकर्त्यांचा विरोध होता. याऐवजी पावसाळ्यात इथे शूटिंग करणे योग्य ठरले असते, असा सल्ला एका कार्यकर्त्याने दिला. रजनीकांत यांनी मात्र अद्याप याविषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे.

दरम्यान, या टीव्ही शोच्या शूटिंगवेळी रजनीकांत यांना गंभीर जखम झाल्याचे वृत्त याआधी आले होते. मात्र अशी कोणतीही गंभीर जखम झालेली नव्हती, किरकोळ जखम होती असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनीकांत यांच्या पायात काटा रुतल्याने त्यांना मोठी जखम झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अनेकांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू केली होती. रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आहेतच, पण त्यांना देवासारखे पूजणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या