दाऊद, राजन म्हातारे झाल्याचं म्हणणाऱ्या सुकाला बनायचं होतं अंडरवर्ल्ड डॉन

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाशिकच्या मनमाडमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठय़ाप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी बदयुजमान अकबर पाशा ऊर्फ ‘सुका’ याचे एकापेक्षा एक कारनामे चौकशीतून पुढे येत आहेत.शिवडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि अंगावर अनेक गुन्हा असलेल्या या सुक्याने आपल्याला मोठा अंडरवर्ल्ड डॉन बनायचं असल्याचं अनेकदा सांगितल्याचं तपासात उघड झालंय. दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन म्हातारे झालेत, आता तरुणांनी अंडरवर्ल्डवर कब्जा करायला पाहीजे असं या सुक्याचं म्हणणं होतं. अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवण्यासाठी त्याला स्वत:ची गँग तयार करायची होती, यासाठीच त्याने उत्तर प्रदेशातील बांदामधून हत्यारं लुटायचं ठरवलं होतं. ही कल्पना त्याला जयपूर जेलमध्ये असताना सुचल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. डॉन म्हणून आपल्याला लोक ओळखावेत, मुंबईत आपला दरारा वाढावा यासाठी सुका पोलिसांनी अटक केली की त्यांच्यासोबत फोटो काढायचा, व्हिडिओ आणि फेसबुकवर टाकायचा.

नाशिकमध्ये सापडलेल्या मोठ्या शस्त्रसाठा प्रकरणी हा सुका आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. या शस्त्रसाठ्यामध्ये २५ रायफल्स,१९ रिव्हॉल्व्हर, मशिनगन आणि ४ हजार पेक्षा जिवंत कातडुसं होती. हा शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून चोरून मुंबईत आणण्यासाठी ओशिवरा येथून बोलेरो जीप चोरण्याआधी सुका आणि त्याच्या साथीदारांनी बंगळुरू येथून हुंदाई क्रेप्टा ही कोरी करकरीत गाडी चोरली होती. नव्या कारमध्ये छुपे कप्पे केले तर संशय येईल म्हणून त्यांनी जुनी कार चोरली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी चेंबूर येथून आणखी तिघांना अटक करण्यात आली.

सुका काही साथीदारांसह नोव्हेंबर महिन्यात बंगळुरूमध्ये गेला. या ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी गाडय़ा भाडय़ाने देतात. सुका आणि त्याच्या साथीदारांनी हुंदाईची क्रेटा ही कार भाडय़ाने घेतली पण ती परत केलीच नाही. याच कारने हे सर्व मुंबईत आले. पोलिसांनी कार अडवली तर पकडले जाऊ ही भीती असल्याने त्यांनी ही कार विकली.