‘ती’च्या नावाने महिलांना फसविणारा भामटा सापडला

सामना ऑनलाईन, मुंबई

‘ती’ असल्याचे भासवून फेसबुकद्वारे महिलांची फसवणूक करणारा भामटा अखेर सापडला. शिताफीने बोलबच्चनगिरी करून महिलांना जाळय़ात ओढल्यानंतर तो त्यांच्याकडून वेगवेगळय़ा बहाण्याने पैसे अथवा सोन्याचे दागिने घ्यायचा आणि पसार व्हायचा. मानखुर्द येथील एका विवाहितेला त्याने अशाप्रकारे गंडा घालून लुटले होते. त्या गुह्यात प्रॉपर्टी सेलेच्या पथकाने त्याला आज बेडय़ा ठोकल्या.

भिकान नामदेव माळी (३७) असे त्या भामटय़ाचे नाव असून तो धुळे येथे पत्नी, मुले व आईवडिलांसोबत राहतो. मानखुर्द येथे राहणाऱया मनीषा (नाव बदललेले) या विवाहितेला भिकानने महिलेच्या नावे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मनीषासोबत त्याने ‘ती’ असल्याचे भासवून नियमित चॅटिंग सुरू केली. दरम्यान, तुमच्या घरात वास्तुदोष आहे. त्यावर आताच उपाययोजना केल्या नाहीत तर संकट कोसळेल अशी भीती घातली. माझा भाऊ वास्तुदोष दूर करण्याचे काम करतो असे सांगून ’ती’ने भिकानचा नंबर दुसऱयाच नावाने मनीषाला दिला. त्यानंतर भिकानने मनीषाला संपर्प साधून ओळख वाढवली. त्यानंतर मनीषाला वास्तुदोष दूर करण्यासाठी दागिन्यांची पूजा करण्याची व त्यासाठी ६० हजार लागतील अशी भीती घातली. घाबरलेल्या मनीषाने तिचे पाच तोळे सोन्याचे दागिने व ६० हजारांची रोकड भिकानकडे पूजा घालण्यासाठी दिली. तो ऐवज घेऊन भिकान पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच प्रॉपर्टी सेलचे सुनील माने, चंद्रकांत वलेकर, नितीन पालांडे, अशोक सावंत आणि किरण जगदाळे या पथकाने मनीषासह अन्य महिलांना फसविणाऱया भिकानचा शोध सुरू केला.

महिलेला फसविण्याच्या प्रयत्नात लटकला

धुळय़ात राहणारा भिकान मुंबईतील एका महिलेला फसविण्याच्या प्रयत्नात होता. हे कळताच माने, वलेकर, पालांडे, सावंत आणि जगदाळे यांनी हीच संधी साधली. पोलिसांनी त्या महिलेच्या मदतीने भिकानला पैसे देतो, असे आमिष दाखवत आज मुंबईत बोलावले. पैशांच्या लालसेपोटी भिकान आज दुपारी जोगेश्वरी पूर्वेकडील इस्माइल कॉलेजजवळ येताच पोलिसांनी त्याला पकडून मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात दिले. भिकानने मनीषासह अन्य महिलांना फसविल्याचे कबूल केले आहे.