आरटीओ अधिकाऱ्याला जखमी करून पसार झालेला अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

रॅपिडो ॲपद्वारे बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करताना अडविल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्याशी बाचाबाची करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता.

पिंटु पुर्णचंद्र घोष (रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात बाईक टॅक्सी सेवेला बंदी आहे. घोष हा बाईक टॅक्सी घेऊन जात असताना विश्रांतवाडी येथे त्याला आरटीओ पथकाने अडविले. कारवाईनंतर महिला अधिकारी त्याच्या गाडीवर पाठीमागे बसून त्याला आरटीओ कार्यालयात घेऊन जात होत्या. मात्र, घोष याने सहायक मोटर वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांशी झटापट करून त्यांना जखमी केले. यानंतर तो पसार झाला. आरोपींचा शोध घेत असताना तो खडकवासला भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. मात्र, आरोपी मिळून येत नव्हता.

अखेर खडकवासला येथील गॅस एजन्सीमध्ये आरोपीच्या नावाचा शोध घेत त्याचा माग काढला. त्यावरून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.