वायकरांचा विजय ‘मॅनेज’; मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर, दोन उमेदवारांची पोलिसांत तक्रार

मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय ‘मॅनेज’ करण्यात आला. मतमोजणी केंद्रात वायकर यांची मुलगी व मेहुण्याने मोबाईलचा वापर करून अंतर्गत सूत्रे हलवली, असा आरोप करीत उत्तर- पश्चिम मतदारसंघातील दोघा उमेदवारांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मतमोजणीतील ‘गोलमाल’ गाजत असतानाच या तक्रारीने  वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि भारत जनआधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी वायकर यांच्या विजयामागील कारस्थान चव्हाटय़ावर आणले आहे. दोघांनी पोलिसांत तक्रार केली आहे. 4 जूनला नेस्को सेंटर येथील मतमोजणी पेंद्रात मोबाईलला सक्त मनाई होती, मात्र वायकर यांची मुलगी दीप्ती आणि त्यांचा मेहुणा हे दोघे बिनधास्त मोबाईल हातात घेऊन मतमोजणी पेंद्रात वावरत होते. किंबहुना, ते मोबाईलवर बोलताना वायकर यांचे नाव घेत मतांबाबत अंतर्गत सूत्रे हलवत होती, याकडे भरत शाह यांनी तक्रारीद्वारे पोलिसांचे लक्ष वेधले आहे. आपण त्याच क्षणी मोबाईल वापराची गंभीर बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पोलिसांकडे पाठवला नाही. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला नसल्याचे भरत शाह यांनी म्हटले आहे.

मतदारांना फसवलेय; पुन्हा निवडणूक घ्या!

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर हेच जिंकले होते. त्यांचा विजय ढापला असून मतमोजणी पेंद्रातील संपूर्ण गोंधळ विचारात घेऊन पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, यासाठी आमचा अमोल कीर्तिकर यांना पाठिंबा आहे. वायकर यांनी मॅनेज करून मिळवलेला विजय ही मतदारांची फसवणूक आहे, असे शाह म्हणाले.

मोबाईलवर चर्चा आणि स्क्रीन बंद

शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांना सलग फेऱ्यांमध्ये मताधिक्य मिळू लागले होते. याचदरम्यान दुपारी वायकर यांची मुलगी व मेहुण्याची मोबाईलवर चर्चा सुरू झाली. नंतर मतमोजणीची स्क्रीन बंद झाली आणि निकालाचा गोंधळ सुरू झाला. अशा प्रकारे वायकर यांचा विजय पूर्णपणे मॅनेजच केला गेला, असा दावा हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केला आहे.