महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांना मॅनेजमेंटचे धडे

पालिका शाळांची मोठी जबाबदारी असणाऱ्या मुख्याध्यापकांना आता मॅनेजमेंटचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवीन तंत्रज्ञान आणि शाळेचे दर्जेदार व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जमनालाल बजाज या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात पालिका शाळांतील निवडक 120 मुख्याध्यापकांना हे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती शिक्षण सहआयुक्त अजित पुंभार यांनी दिली.

पालिका शाळांचा दर्जा सुधारून मुलांना अद्ययावत शिक्षण आणि सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळेच एप्रिलपासून आतापर्यंत राबविलेल्या ‘मिशन अॅडमिशन’ उपक्रमात तब्बल 1 लाख 20 ने  विद्यार्थी संख्या वाढून एकूण पटसंख्या 4 लाखांपार गेली आहे. या यशानंतर शाळा-विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या मुख्याध्यापकांमध्ये नेतृत्व गुण विकसित करून, व्यवस्थापनाचे धडे देऊन त्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी  ‘आयएसआय’ अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाप्रमाणे जमनालाल बजाज संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे 40 सेशन आयोजित करण्यात येणार आहेत.

शाळेची जबाबदारी असणाऱ्या व शाळा आणि प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या मुख्याध्यापकांमध्ये सकारात्मकता वाढवून कार्यक्षमता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, जेणेकरून संपूर्ण शिक्षण विभागाच्या अद्ययावतीकरणाला मदत होणार आहे.

– अजित कुंभार, सहआयुक्त, शिक्षण

असा राबवणार उपक्रम

मुख्याध्यापकांकडे शाळेची महत्त्वाची जबाबदारी असल्याने शाळेच्या दैनंदिन कारभारात अडथळा ठरणार नाही याची दक्षता या उपक्रमात घेण्यात येईल.

आठवडय़ात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस सकाळच्या सत्रात दीड तासाचे 40 सेशन आयोजित करण्यात येतील.

सुमारे तीन महिन्यांत हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल. यानंतर सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येईल.