दत्तगुरूंशी वेगळं नातं! : गायक मंगेश बोरगावकर.

156

घरात वारी असल्याने विठोबा घरचाच आणि शिवाय दत्तगुरूंचा सहवास अतिप्रिय…

> आपलं आवडतं दैवत? ः गणपती बाप्पा आणि दत्तगुरू यांच्यावर माझी खूप भक्ती आहे.

> त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? बाप्पाबद्दल लहानपणापासून उत्सुकता वाटते. त्याच्याबद्दलचा एक ओढा आहे. माझी गाण्याची पहिली सेवा दत्तमंदिरात लहानपणी झाली. त्यामुळे दत्तगुरूंबद्दल एका वेगळ्या नात्याला इथूनच सुरुवात झाली.

> संकटात ते तुला कशी मदत करतात असं वाटतं? भक्ती आणि तुमचं काम महत्त्वाचं. त्याच्यावर भक्ती आणि विश्वास ठेऊन प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचे आशीर्वाद मिळतात.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालतोस? दरवर्षी आषाढ महिन्यात विठ्ठलाची सेवा करतो. यामुळे भक्तीही होते. माझं वारकरी घराणं आहे. हा वारसा मला चार पिढय़ांपासून लाभलाय, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

> आवडत्या देवाला प्रार्थना केली आणि यश मिळालंय असा प्रसंग? चांगलं शिकायला मिळणं, कार्यक्रम मिळणं, पुरस्कार मिळणं यामध्ये मनापासून चांगलं काम करता आणि देवाची प्रार्थना करता तेव्हा यश मिळतं.

> देवावर रागवता का?   प्रदूषण करून पृथ्वीचं नुकसान झाल्यावर देवाकडे धावा केला तर काहीच होणार नाही. निसर्गाची काळजी घेतली तर आपोआपच आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळतील.

> देव तुमचे लाड कसे पुरवतो असं तुम्हाला काटतं? संगीत घराण्यात मी जन्मलोय आणि त्यातच मी पुढे जातोय. हे लाडच आहेत.

> त्यांचं कोणतं स्वरूप आवडतं? अष्टविनायकातली गणपतीची रूपं खूप आवडतात. दत्तगुरू महाराजांचं मूळ रूप आणि दत्त जन्माचा सोहळा मला खूप आवडतो.

> त्यांच्यापाशी काय मागतो? मागत काही नाही फक्त एवढीच इच्छा व्यक्त करेन की,  सगळ्यांना सुबुद्धी लाभो आणि निसर्गाचं रक्षण करू. त्यामुळे कित्येक पिढय़ा आनंद घेऊ शकतील.

> नियमित उपासना कशी करतो? माझ्या मनात सांगितीक विचार सतत सुरूच असतात.  याबरोबरच उपासना म्हणून अथर्वशीर्ष रोज म्हणतो. दत्तगुरूंचा जप रोज करतो.

आपली प्रतिक्रिया द्या