मंगेश तेंडुलकर

886

>>मेधा पालकर<<

मितभाषी, पण कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मार्मिक भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने सत्त्व आणि तत्त्व जपणाऱ्या व समाजप्रबोधनासाठी आपल्या कलेचा वापर करणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या पिढीचा आणखी एक दुवा निखळला आहे. मंगेश तेंडुलकरांनी आपल्या ठसठशीत रेषांच्या माध्यमातून त्यांची सामाजिक, राजकीय व अन्य व्यंगचित्रे अमर केली. खरे तर  त्यांनी व्यंगचित्रकलेचे कुठलेही रीतसर शिक्षण घेतले नव्हते. ही कला म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगी होती. कोल्हापूर येथे १५ नोव्हेंबर १९३६ साली त्यांचा जन्म झाला. पुढे शालेय शिक्षणासाठी ते पुण्याला आले. भावे हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे गरवारे महाविद्यालयातून बीएससीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण करताच त्यांनी लिव्हर या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून नोकरी केली. पण ती दगदग सहन होत नव्हती म्हणून खडकी येथील ऍम्युनेशन फॅक्टरीमध्ये ३० वर्षे नोकरी केली. मंगेश तेंडुलकर यांना मुळातच इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची आवड होती. ती जपत असतानाच त्यांचे बंधू प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एक पुस्तक आणले होते. ते व्यंगचित्रांवरचे होते. ते मंगेश तेंडुलकर यांनी पाहिले आणि तेव्हापासून त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी पहिले व्यंगचित्र आपल्या शिक्षकांचे रेखाटले. व्यंगचित्र रेखाटन सुरू असतानाच वाचन आणि लेखनाची आवड त्यांनी जोपासली होती. मंगेश तेंडुलकर यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या व्यंगचित्रकलेविषयी विशेष जिव्हाळा आणि आदर होता. ते एकदा आपला व्यंगचित्रांचा ठेवा  मुंबईला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. तेव्हा त्यांच्या व्यंगचित्राला ‘मार्मिक’ मधून पहिली प्रसिद्धी मिळाली. नंतर तेंडुलकर यांची व्यंगचित्रे, त्यांचे नाटय़विषयक लेखन, सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे लेख दैनिक ‘सामना’मधूनही प्रसिद्ध झाले. मंगेश तेंडुलकर यांच्या मुंबईत झालेल्या चित्रप्रदर्शनानिमित्ताने शिवसेनाप्रमुखांविषयीची एक आठवण तेंडुलकरांची कन्या नेहा सांगतात. त्या म्हणाल्या, ‘मुंबईतल्या आपल्या पाचव्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करावे अशी बाबांची इच्छा होती. म्हणून ते ‘मातोश्री’वर गेले. बाळासाहेबांनी बाबांची चित्रे पाहिली. ते म्हणाले, ‘तुमच्या रेषा तिरकस आहेत, पण बोचत नाहीत’. बाळासाहेबांनी दिलेली ही कौतुकाची पावती बाबांसाठी मोलाची ठरली. त्यानंतर व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बाळासाहेबांनी केले. तेंडुलकर यांनी अनेक व्यंगचित्रे रेखाटून ती समाजासमोर आणली. कवी गुलजार, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, विजय तेंडुलकर, वसंत गोवारीकर अशा दिग्गजांनी तेंडुलकरांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांचा ९९ व्यंगचित्र प्रदर्शने भरविण्याचा संकल्प होता. नुकतेच त्यांचे ८६ वे प्रदर्शन पार पडले. आता त्यांचा व्यंगचित्र प्रदर्शनाचा संकल्प पूर्ण करण्याचे त्यांच्या कन्येने ठरविले आहे. व्यंगचित्राइतकेच त्यांचे लिखाणावर प्रभुत्व होते. नाटय़विषयक लेखन त्यांनी केलेच, पण त्याचेवळी सामाजिक समस्यांवरही ते लेखन करत होते. दै. ‘सामना’मध्ये ‘बाप दाखव’ या सदरामध्ये त्यांनी अनेक सामाजिक विषयांचा वेध घेतला तर ‘आपटबार’ या सदरामध्ये त्यांचे दररोज एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. त्यांचे पहिले व्यंगचित्र ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यांचा शेवटचा लेखही दै. ‘सामना’च्या मंगळवारच्या पुणे आवृत्तीत ‘बाप दाखव’ या सदरामध्ये प्रसिद्ध झाला. तेंडुलकर सर आणि दै. ‘सामना’ यांच्यातील ऋणानुबंधच यातून स्पष्ट होतो. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाशी मैत्री करून त्यांनी आपले लेख, कार्टुन तत्परतेने कसे वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचतील यांची काळजी घेतली. आपले कोणतेही ओझे पुढच्या पिढीवर नसावे असा त्यांचा विचार असायचा. वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले मंगेश तेंडुलकर यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते स्वतः त्यांच्या बजाजच्या ऍव्हेंजर या क्रुजर बाईकवरून प्रवास करायचे. त्यांच्या गाडी चालविण्याचे सर्वांनाच कुतूहल असायचे. कितीवेळा त्यांच्या निळय़ा बाईकबरोबर फोटो काढण्याचा मोह रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणाईला होत असायचा. आपण ही क्रुजर बाईक वापरण्यामागचे कारण तेंडुलकर सांगायचे, ते म्हणायचे, ‘ही गाडी वेडीवाकडी चालवता येत नाही. गाडीवर बसले की, कट मारता येत नाही. गाडी सरळ पळवावी लागते. शिवाय ती आरामदायी आहे.’ प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपली आवड जोपासली होती. ‘मी समाधानी आहे’ असे ते नेहमी म्हणत.मृत्यूकडेही त्यांनी तटस्थपणे पाहिले. म्हणूनच त्यांच्या ८६ व्या व्यंगचित्र प्रदर्शनामध्ये त्यांनी ‘मी आणि माझा मृत्यू’, ‘मी जिवंत असल्याचा मला समजलेला अर्थ’ अशी व्यंगचित्रे रेखाटली होती. शेवटच्या श्वासापर्यंत व्यंगचित्रकला जगणारे तेंडुलकर सर आज जगातून गेले असले तरी त्यांची व्यंगचित्रे पुढील असंख्य पिढय़ांना मार्गदर्शन करीत राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या