।।जय देवी मंगळागौरी।।

815

 गिरिजा जोशी-उद्गीरकर

घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱया महिला आजही वेळात वेळ काढून मंगळागौर उत्साहाने साजरी करतात. त्यात आपल्या अभिनेत्री तरी कशा मागे राहणार… त्यांनीही यंदा त्यांची मंगळागौर पारंपरिक पद्धतीला आधुनिक टच देऊन साजरी केली…

श्रावण हा व्रतवैकल्पाचा महिना. श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी होते. माहेरवाशिणी पहिल्या मंगळागौरसाठी माहेरी येतात. मंगळागौर ही सौभाग्याची देवता असल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. नवविवाहिता सलग पाच वर्षे मंगळागौर करतात. ‘नाच गं घुमा’, ‘आंबा पिकतो रस गळतो’, ‘किस बाई किस दोडका किस’ अशी गमतीशीर गाणी बोलून मंगळागौरचा खेळ खेळला जातो. एवढेच नाही तर यात ठसकेबाज उखाणे, झिम्मा, फुगडी, टाळ्यांवर धरलेला फेर हे सगळंच अंगावर रोमांच उभे करणारं असतं. बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी असे विविध प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे घरातल्या वस्तूंचा त्यांच्या या खेळात समावेश केलेला असतो. फारशा रुढी-प्रथा माहीत नसल्याने अलीकडे मंगळागौर खेळणाऱया महिलांना बोलावले जाते. त्यामुळे मंगळागौरचे पारंपरिक खेळ, गाणी याची माहिती मिळते. त्यामुळे रोजच्या कामाच्या व्यापात मंगळागौरीच्या निमित्ताने महिला धमाल करून ताजातवान्या होतात.

गुलाबजामवर ताव..बहिणींच्या मंगळागौर पाहिल्या असल्याने माझी मंगळागौर कशी असेल याबाबत मला उत्सुकता होती. गेल्या वर्षी सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी मंगळागौर साजरी केली. सासरी नाशिकला सभागृह घेतला होता. मंगळागौर खेळणाऱया महिलांचा समूह बोलावला होता. झिम्मा, फुगडी, पारंपरिक खेळ अशा छानशा वातावरणात सासरी मंगळागौर साजरी केली. मीही फेर धरला होता. सकाळी नाशिक आणि रात्री माहेरी साजरी केली. मी फुडी असल्याने सासरी पुरणपोळ्या, माहेरी आईच्या हातचे गुलाबजामवर ताव मारला होता.

 अनुजा साठे-गोखले…लक्षात राहिलेली मंगळागौर

माझी मंगळागौर छान साजरी केली होती. त्यावेळी कुतूहल आणि उत्साह अशा दोन्ही भावना एकाचवेळी वाटत होत्या. मंगळागौरची तयारी खूप आधीपासून सुरू केली होती. त्यासाठी खास साडी नेसून पारंपरिक दागिने घातले होते आणि छान तयार झाले होते. माझ्या मंगळागौरसाठी आमचे नातेवाईक, मैत्रिणी आल्या होत्या. माझ्यासाठी एक छान गेटटूगेदरच होते. बरेच महिने न भेटलेल्या मैत्रिणी, नातेवाईक खास माझ्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर झिम्मा, फुगडी, खेळांना सुरुवात झाली. कधीही न पाहिलेले प्रकार त्या दिवशी पाहण्याचा आनंद लुटता आला. त्यांनी धरलेल्या फेऱयावर मग माझेही पाय थिरकायला लागले मजा, मस्ती असा हसत खेळत तो दिवस घालवल्याने खूप ताजेतवाने वाटायला लागले. कामाला जायचे असल्याने जागरण वगैरे करता आले नाही, पण खूप धमाल केली. ती मंगळागौर कायम लक्षात राहिली.

मयूरी वाघ-रानडे..पहिलीच मंगळागौर

पहिलीच मंगळागौर असल्याने खूप उत्सुक होते. बरेच दिवस त्याची तयारी सुरू होती. खास मंगळागौरसाठी सासरी बडोद्याला गेले होते. बडोद्यात मंगळागौर खेळणाऱया महिलांचे ग्रुप नसल्याने घरच्या घरीच साजरी केली. माझे आई-बाबाही बडोद्याला आले होते. मूळची मुंबईची असल्यामुळे आमच्यामध्ये मंगळागौर साजरी केली जात नाही. त्यामुळे सासरीच मंगळागौर साजरी केली. त्यासाठी नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने घालून तयार झाले होते. नंतर देवीची पूजा केली. शूटिंग नसल्याने दोन-तीन दिवस राहण्याच्या बेताने गेले होते. माझ्या नणंदा, पियुषचे नातेवाईक जवळपासच राहत असल्याने तेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पूजा झाल्यावर झिम्मा, फुगडी असे पारंपरिक खेळ खेळलो. दुसऱया दिवशी सगळ्यांना कामावर जायचे असल्याने पूर्ण रात्र जागता आली नाही. पण बारा वाजेपर्यंत जागे होतो. आमच्याकडे माझे सासरे आणि आजोबा व्हायोलिनचे कार्यक्रम करत असल्याने घरात चांगली गाण्याची मैफल जमली होती. या मैफलीत फक्त घरातील महिलाच नाही तर पुरुषही सहभागी झाले होते. दमशेराज, गाण्यांच्या भेंडय़ा अशा आधुनिक खेळांनी साजरी केली. त्यात बऱयाच दिवसाने सगळे एकत्र आल्याने गप्पांचा फडही चांगला रंगला होता. आम्ही मुंबईला असल्याने बडोद्यात खूप कमीवेळा जाणं होतं. त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटण्याचा आनंद मिळाला आणि आता रिफ्रेश झाले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या