राजस आंबा

907

 

नुकताच अक्षय्य तृतीयेचा सण पार पडला. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या या सणाला आंबे खाण्याचा शुभारंभ करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालू आहे. त्यामुळे घराघरात आंब्याच्या पेटय़ा आणल्या गेल्या असतील. मात्र मधुमेह असल्यामुळे फळे खाता न येणारे काही जण मात्र निराश झाले असतील. मधुमेह झालेल्या व्यक्तींना फळे खायला आजीवन बंदी घातल्यासारखीच असते. त्यामुळे समोर आंब्याची पेटी दिसत असूनही मधुमेहींना तोंडावर ताबा ठेवावा लागत असेल. मात्र सेलिब्रिटी न्युट्रिशियनिस्ट ‘ऋजुता दिवेकर’ यांनी आंब्याची आवड असलेल्या पण मधुमेहामुळे आंबे खाता न येणाऱयांसाठी खूशखबरच आणली आहे. ऋजुता यांनी मधुमेहींना बिनधास्त दररोज एक आंबा खाण्याची परवानगी दिली आहे.

‘आंबे हे मधुमेहीसाठी उत्तम फळ आहे. हे फळ शरीरासाठी पोषक असलेल्या ऑण्टिआक्सिडंट आणि फायबरने समृद्ध आहे. आंब्यातील या पोषक तत्त्वांमुळे मधुमेहींच्या रक्तातील इन्सुलीनचे प्रमाण वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनी आंबा न खावा असे काही कारणच नाही. अमेरिकेतील डायबिटीस असोसिएशन आणि मायो क्लिनिकनेदेखील मधुमेहींना आंबा खाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपल्या  जिभेवर ताबा ठेवण्याची बिलकूल गरज नाही. बिनधास्त आंबा खा, पण दिवसाला एकच.’ असे ऋजुता सांगतात.

आंब्याचे फायदे

आंब्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, प्रोबायोटिक फायबर, आर्यन, ऑण्टिऑक्सिडंटस अशी शरीरासाठी पोषक तत्त्वे मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्यामुळे आंबे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

हदयविकारासाठी फायदेशीर आंब्यामध्ये फायबर, पोटॅशियम, विटॅमिन असल्यामुळे हदयविकार होण्याची शक्यता फार कमी असते. आहारात पोटॅशियमचे अधिक प्रमाण आणि सोडियमयुक्त पदार्थाचा वापर करणे नेहमी फायदेशीरच असते.

पचनशक्ती वाढवते जेवणानंतर आंबा खाल्ल्यामुळे आपण खाल्लेल्या पदार्थातील चरबी नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे खाल्लेले जेवण हलके होते व आंब्यातील फायबर हे जेवण पचविण्यास मदत करते.

पोटातील आम्ल कमी होते जेवणानंतर पोटात जमा होणारे आम्ल आंब्यामुळे कमी होते. आंब्यातील एन्झायम्समुळे पोटाला थंडावा मिळतो. आंबा गरम असतो, पण त्याला खाण्याआधी तासभर जरी पाण्यात भिजवून ठेवला तर तो पोटाला थंडावाच देतो.

हाडे बळकट होतात आंब्यातील ‘क’ जीवनसत्त्व हे हाडांसाठी अत्यंत उपयुक्त असते. या जीवनसत्त्वामुळे हाडे बळकट बनतात आणि त्यांची योग्य प्रकारे वाढ होते.

आंब्याबद्दल काही …

आंब्याचा शोध तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी हिंदुस्थानात लागला होता. त्यानंतर हिंदुस्थानातून आंब्याची माहिती दक्षिण आशियात पसरत गेली व तेथून जगभरात पसरली.

आंबा हा हिंदुस्थान, पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशांचे राष्ट्रीय फळ आहे. तर आंब्याचे झाड हे बांगलादेशचे राष्ट्रीय झाड आहे.

जगभरातील एकूण आंबा उत्पादनाच्या अर्धे उत्पादन हे हिंदुस्थानात होते. मात्र हिंदुस्थानी जनतेला आंबा इतका प्रिय आहे की या उत्पादनाचा तब्बल ९० टक्के भाग हा हिंदुस्थानातच संपतो. तर फक्त १०टक्के भाग हा निर्यात होतो.

जगभरात बाराही महिने आंब्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे इतर फळांपेक्षा आंबा हे सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या