…एकच पुरे

262

>> ज्योत्स्ना गाडगीळ

नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार आजच्या स्त्रीला मुलांबाबत ‘एकच पुरे’ हा निर्णय घ्यावासा वाटतो आहे. काय असतील यामागची कारणे…?

‘अष्टपुत्रवतीSSS भव!’
‘पुत्रवतीSSS भव!’ ‘सुखीSSS भव!’
आशीर्वादाचे हे तीन प्रकार गेल्या तीन दशकांतील स्थित्यंतरे दर्शवतात. आजची पिढी ‘हम दो, हमारा एक’ या निर्णयावर येऊन ठेपली आहे. त्यामागे शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक अशी अनेक कारणे आहेत. चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार केकळ 24 टक्के महिलांना दुसऱ्या मुलासाठी चान्स घ्यावासा वाटतो. ‘पहिले मूल ३० वर्षांच्या आत झाले पाहिजे’, ‘लग्नानंतर वर्षभराच्या आत पाळणा हलला पाहिजे’, ‘पुढच्या दोन वर्षांनी दुसऱ्या अपत्याचा विचार केला पाहिजे’, काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्येष्ठ मंडळींकडून अशा प्रकारच्या सूचना नवदांपत्याला दिल्या जात असत. एकटे मूल हट्टी होऊ नये, चिडचिडे होऊ नये, भविष्यात त्याला भावंडांचा आधार मिळावा हा त्या सूचनांमागचा आशय असे. मात्र आता शहरी भागात मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढल्याने पुढची समीकरणेही आपोआप बदलली आहेत.

‘एकालाच सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात, दुसऱ्याचा काय विचार करणार!’…. ‘शिक्षण किती महाग झालंय बघितलंत ना? मुलांना जन्माला घालून त्यांच्या प्राथमिक गरजा आपण पूर्ण करू शकलो नाही, तर काय उपयोग?’…‘पहिल्याच बाळंतपणानंतर एवढी सुटलेय, दुसरा चान्स कोण घेईल, नकोच!’….‘एकाच मुलाला पुरेसा वेळ देता येत नाही, मग दुसऱ्याचा काय विचार करणार, एकच पुरे!’ अलिकडे ही वाक्ये सर्रास आपल्या कानावर पडतात.

करीअर ओरिएंटेड असलेली आजची पिढी स्वावलंबी आणि स्थिरस्थावर झाल्यावर लग्नाचा निर्णय घेते. विभक्त कुटुंब पद्धती, वाढती महागाई, आरोग्याच्या समस्या, नात्यामधील ताणतणाव, व्यस्त जीवनशैली या कारणांमुळे सद्यस्थितीतील दांपत्ये ‘एक मूल पुरे!’ या निर्णयावर येऊन थांबली आहेत. या निर्णयाचे अनेक फायदे-तोटे आहेत, परंतु हिंदुस्थानची वाढती लोकसंख्या पाहता, या निर्णयाकडे सकारात्मकतेने पाहिले जात आहे. भविष्यात मुलांना सख्खे काका, मामा, आत्या, मावशी नसतील, परंतु मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने तो दूरच्या नात्यांमध्ये सख्य निर्माण करील अशी आशा बाळगायला हरकत नाही!

‘प्रसूतीनंतर स्त्री देहात अनेक बदल घडतात. या बदलांशी जुळवून घेत असताना तीन महिन्यांच्या कालावधीत महिलांना नोकरीवर रुजू व्हावे लागते. पुरेसा आरामही मिळत नाही. त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसू लागतात. वाढते वजन, अनेक प्रकारची दुखणी या त्रासामुळे दुसऱ्या बाळाचा विचार करण्यास मन धजावत नाही!’
– आरती गोगटे, गृहिणी

‘खरे पाहता पहिले मूल
३० वर्षांच्या आत होणे हे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरते, वाढत्या वयात स्त्रीयांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन बाळाच्या आरोग्याकडे, अभ्यासाकडे,करीअरकडे लक्ष देणे ही तारेवरची कसरत असते. मात्र, या गडबडीत पालकांच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या एकुलत्या एक मुलावर लादले जाते, अशाने ती कोमेजतात. तसे संभाव्य धोके टाळले तर या निर्णयाकडे नक्कीच सकारात्मकतेने बघू शकतो.’
– डॉ. नेहा पाटणकर, स्त्रीरोगतज्ञ.

एकच मूल असण्याचे फायदे
एकच मूल असेल तर तुमचं प्रेम, लक्ष, केळ, शक्ती, पैसे एकाच मुलाकर केंद्रित करता येतात. विकासाच्या जास्त संधी एकाच मुलाला देता येतात. एकुलती एक मुले शिक्षणात जास्त यशस्वी होतात. स्वावलंबी होतात. इतरांशी सहज मैत्री करतात. त्यांना दर्जेदार राहणीमान, आरोग्य सेवा पुरवता येतात. कुटुंब लहान राहिल्याने दरडोई उत्पन्न काढते. कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावतो.

एकच मूल असण्याचे तोटे
एकुलत्या एका मुलाकर मोठेपणी आईकडील आणि दोन्हीकडचे आजीआजोबा अशा सहा वृद्धांची जबाबदारी येते. वृद्धांना भावनिक व दैनंदिन जीवनासाठीही आधार लागतो. तो देताना एकुलत्या एक मुलाची तारांबळ उडते अन्यथा त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा पर्याय निवडावा लागतो. तसेच एकुलती एक कमाकती मुलगी असेल तर तिला लग्न करणे जड जाते. लग्नानंतर तिला स्वतःचे आईकडील, सासूसासरे, नवरा आणि मुले अशा तीन पिढ्य़ांचा आधारस्तंभ व्हावे लागते. ही सर्व जबाबदारी एकहाती पेलण्याइतकी सहनशक्ती आणि संयम आताच्या पिढीत उरलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या