काँग्रेसला मोठा हादरा; प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला, 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

पंजाबमधील बंडाळी शांत करण्यात यश मिळवलेल्या काँग्रेससमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथौनम यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यानंतर 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करायची तयारी पूर्ण केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येऊ लागलं. या सगळ्या आमदारांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं कळतंय. असं झाल्यास काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असेल कारण पुढच्या वर्षी मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

गोविंददास यांनी काँग्रेस सोडणं हे काँग्रेस नेत्यांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. गोविंददास हे 6 वेळा विधानसभा निवडणूक जिंकले असून त्यांनी विरोधीपक्ष नेत्याची भूमिकाही बजावली आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. सध्या मणिपूरमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असून आगामी निवडणुकीतही भाजपलाच विजय मिळावा यासाठीची ही व्यूहरचना असल्याचे सांगितले जात आहे.

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. तिथे 2017 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. एनपीएफ आणि एनपीपी या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसचा इथे 1 आमदार निवडून आला होता तर 3 आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. सध्या या विधानसभेत 4 जागा रिक्त असल्याने एकूण संख्याबळ हे 56 इतके झाले आहे. भाजपने एनपीएफ,एनपीपी आणि अपक्षांची मदत घेत मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भाजपला घाबरतात त्यांनी खुशाल काँग्रेस सोडून जावे- राहुल गांधी

काँग्रेसला धाडसी कार्यकर्ते हवेत. पक्षात राहून जर कुणी भाजप आणि आरएसएसला घाबरत असेल तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. अशा लोकांची आम्हाला अजिबात गरज नाही. जे घाबरले, ते आरएसएसचे झाले. आरएसएसवर निष्ठा वाहणाऱ्यांनी खुशाल तिकडेच जावे, मजा करावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता.

काँग्रेसच्या सोशल मीडिया युनिटसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधींनी ही सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले, असे खूप लोक आहेत, जे धाडसी आहेत, परंतु काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात घेतले पाहिजे. याचवेळी जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत, मात्र त्यांना भाजप आणि आरएसएसची भीती वाटतेय, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या अशा लोकांची आम्हाला गरज नाही. “चलो भैया जाओ, आरएसएस के हो, जाओ, भागो, मजा लो’’ आम्हाला धाडसी लोकांची गरज आहे. ही आमची विचारधारा आहे. हाच माझा मूळ संदेश आहे, अशी रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधींनी काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांचा समाचार घेतला. नागालॅण्डचे काँग्रेस खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राहुल गांधींच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला. हे महात्मा गांधींच्या पावलांवर चालण्याचे उदाहरण आहे. भाजप-आरएसएसच्या तिरस्कारी अजेंडय़ाला दिलेले उत्तर आहे, असे रेड्डी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान बोलतात, तेव्हा लोक हसतात!

काँग्रेस कार्यकर्त्यांना आता भाजपच्या ‘फेक न्यूज’मुळे घाबरण्याची गरज नाही. ज्यावेळी पंतप्रधान सांगतात की योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगले काम केले आहे, त्यावेळी लोक हसतात. भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक न्यूज’वर विश्वास ठेवणे आता लोकांनी सोडून दिलेय, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही यावेळी टोला लगावला.

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद निशाण्यावर

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद हे राहुल गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जायचे. या नेत्यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सध्या काहीजण पक्षात राहून बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. राहुल गांधींनी सोशल मीडिया युनिटच्या बैठकीत अशा लोकांवर कुणाचेही नाव न घेता जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमध्ये आधीपासूनच असंतुष्ट नेत्यांचा ‘जी-23’ समूह आहे. पंजाबमध्येसुद्धा निवडणुकीआधी पक्षातील मतभेद उफाळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पक्षाची सडेतोड भूमिका मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या