Manipur unrest आतापर्यंत 226 जणांचा मृत्यू, 59,000 हून अधिक बेघर; मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची माहिती

गेल्या सव्वा वर्षापासून मणिपूरमध्ये मधील हिंसाचाराच्या घटनांनी देशाला हादरवून सोडलं आहे. अजूनही मणिपूरच्या अनेक भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांनी बुधवारी विधानसभेत माहिती दिली की मे 2023 पासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 226 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 39 बेपत्ता आहेत, तर 59,414 लोक मदत शिबिरांमध्ये राहात आहेत. ही आकडेवारी मंगळवारपर्यंतची असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हिंसाचारात तब्बल 11,133 घरे जाळण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यात 11,892 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या सर्व परिस्थितीत राज्य सरकारानं विस्थापितांना आश्रय देण्यासाठी 302 मदत छावण्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

काँग्रेस आमदार के मेघचंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बिरेन म्हणाले की, 5,554 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बाधित झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

‘शेतीच्या नुकसानीची दखल घेऊन, 3,483 बाधित शेतकऱ्यांना रु. 18.91 कोटी पीक नुकसान भरपाई देण्यात आली आहे’, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी 798 लाभार्थ्यांना कायमस्वरूपी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 21.68 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय, ज्यांची घरे जळाली किंवा नुकसान झाले अशा 2,792 कुटुंबांना अंतरिम मदत म्हणून रु.25,000 देण्यात आले आहेत.