खडसेंचे दाऊदशी संबंध जोडणारा हॅकर मनीष भंगाळे गजाआड

सामना ऑनलाईल । मुंबई

भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची पत्नी यांच्यात अनेकदा फोनवरून संभाषण झाल्याचा सनसनाटी आरोप करीत खळबळ उडविणारा हॅकर मनीष भंगाळे यालाच अखेर बेड्या पडल्या. मनीषच्या आरोपात काहीच तथ्य न आढळल्याने मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाकिस्तान टेलिफोन कंपनी आणि हिंदुस्थानातील मोबाईल कंपनीची वेबसाइट हॅक करून खडसे आणि दाऊदच्या पत्नीमध्ये वारंवार फोन संभाषण झाल्याचा दावा मनीष भंगाळे याने एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पण मनीषचा दावा बिनबुडाचा असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तरी देखील गुन्हे शाखेने या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून सखोल तपासणी करून घेतली. पण त्यातही काहीच तथ्य आढळले नाही. शिवाय ज्या नोंदी किंवा कागदपत्रे दाखवून भंगाळे आरोप करत होता ती सर्व बनावट असल्याचे आपल्या तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे मनीष यालाच अटक केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, भंगाळेने कोणतीही वेबसाइट हॅक केल्याचे आमच्या चौकशीत निष्पन्न झालेले नाही. मुळात मनीष हॅकर आहे का हाच आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिला आहे. खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यामागे भंगाळे स्वतः आहे की कोणाच्या सांगण्यावरून त्याने हे आरोप केलेत याचा तपास आम्ही करणार असल्याचे ते अधिकारी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या