मनीष माहेश्वरी ‘ट्विटर’चे नवे संचालक

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटने मनीष माहेश्वरी यांना हिंदुस्थानातील आपल्या साईटचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे. ट्विटरने सोमवारी ही माहिती दिली. गेल्याच वर्षी तरनजीत सिंह यांनी ट्विटर इंडियाच्या प्रमुख पदावरून राजीनामा दिला होता. त्यानंतर देशातील संचालनाची तात्कालिक जबाबदारी बालाजी क्रिश यांना देण्यात आली होती. ट्विटरने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, मनीष माहेश्वरी यापूर्वी नेटवर्क-18 डिजिटलचे सीईओ म्हणून काम पाहात होते. आता 29 एप्रिलपासून ते ट्विटर इंडियाच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारतील. ट्विटरसाठी हिंदुस्थान ही संदेशवहनाची मोठी बाजारपेठ असून ट्विटरने या देशात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीची टीम येथील नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे आपली कार्यालये स्थापणार आहे.