‘या’ आहेत देशातील पहिल्या महिला हमाल

सामना ऑनलाईन । जयपूर

आज स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. स्त्रीया कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. जयपूरमधील एक महिला आता हमाल म्हणून पुढे आली आहे. मंजू देवी असं त्यांचं नाव आहे. मी हमाली करते हे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे त्या हिंदुस्थानातील पहिल्या हमाल आहेत.

हमाली म्हणजे शारीरिक मेहनतीचं काम आहे. अशा मेहनतीच्या आणि ताकदीच्या क्षेत्रातही महिला काम करू शकतात असं मंजू यांनी दाखवून दिलं आहे. पतीच्या निधनानंतर घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने मंजू यांनी हमाली करण्याचा निर्णय घेतला. मंजू सध्या जयपूर रेल्वे स्थानकात काम करतात. मंजू यांच्या पतीचं १० वर्षांपूर्वी निधन झालं होतं. ते देखील हमाली करायचे. पतीच्या निधनानंतर तीन मुलांचं संगोपन करण्याच जबाबदारी मंजू यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी पतीच्या लायसन्स नंबरवर हमाली करायचा निर्णय घेतला.

सुरुवातीला हमालीचं काम करताना त्रास व्हायचा मात्र नंतर सवय झाली. स्टेशनवरील इतर हमालांनी खूप मदत केली, असं मंजू यांनी सांगितलं. मंजू यांच्या कामाबाबतची दखल घेत महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून त्यांचा गौरव केला जाणार आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचा सन्मान महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून केला जातो.