मंजुळाला झालेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीत कैद

11

सामना प्रतिनिधी । मुंबई

महिला कैदी मंजुळा शेट्य़े हिला भायखळा येथील तुरुंगात झालेली अमानुष मारहाण सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. फॉरेन्सिक लॅबचा याबाबत अहवाल आला असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या भक्कम पुराव्यामुळे महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या हत्याकांडातील आरोपी जेलर मनीषा पोखरकर आणि पाच महिला कॉन्स्टेबल यांच्या पोलीस कोठडीत १४ जुलैपर्यंत वाढ केली.

भायखळा महिला तुरुंगात वॉर्डन मंजुळा शेट्य़े हिचा जेलर मनीषा पोखरकर आणि महिला पोलीसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोखरकरसह सहा महिला पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली पोलीस कोठडी संपत असल्याने आज मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. आरोपींनी मंजुळाला केलेली मारहाण सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फोडण्यात आल्याने त्याचा डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला होता. लॅबने दिलेल्या मिरर इमेजमध्ये बरेच काही आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या भक्कम पुराव्यामुळे महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व आरोपींची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवली.

कायद्याचे ज्ञान असल्याने तपासामध्ये असहकार्य
मंजुळाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे त्या चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याचे तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी सांगितले. इतकेच नाही तर या हत्याकांडामध्ये आणखी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्या म्हणाल्या.

संवेदनशील आणि मोठा गुन्हा
तुरुंगामध्ये मारहाणीत कैद्याचा मृत्यू होणे, हा संवेदनशील आणि मोठा गुन्हा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आरोपी अनेक आहेत. तपास अधिकारी एकच असल्याने चौकशीला विलंब होत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. यात अनेक साक्षीदार असून त्यांची जबानी आणि आरोपींनी दिलेली माहिती याची सांगड घालायची आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

काठ्य़ा जाळल्याचा संशय
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मंजुळाला काठ्य़ांनी मारहाण करीत असल्याचे दिसत आहेत. या काठ्य़ा जप्त करण्यासाठी पोलिसांनी काही आरोपींच्या घराची झडती घेतली, मात्र हाती काहीच लागले नाही. काठ्य़ांबाबत प्रत्येक आरोपीच्या जबानीत विसंगती असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी काठ्य़ा जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चौकशी काढून घेण्याची विनंती
व्हॉट्सअॅप ग्रुप बनवल्याप्रकरणी आरोप होत असल्यामुळे साठे यांनी हत्याकांडाची चौकशी आपल्याकडून काढून घ्यावी असा विनंती अर्ज अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केला. त्या अर्जानंतर त्यांना तपासातून हटविण्यात आले असून ही जबाबदारी पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे देण्यात आली.

स्वाती साठे यांचा अहवाल महिला आयोगाने फेटाळावा- नीलम गोऱ्हे
मंजुळा शेट्य़े हिच्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस महिलांच्या बाजूने व्हॉटसअॅपवर करण्यात आलेल्या मेसेजबाबत स्वाती साठे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे मेसेज आपण केलेले नाहीत याचा खुलासाही त्यांनी केलेला नाही. त्यामुळे स्वाती साठे यांचे वर्तन अत्यंत खेदजनक आहे. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे त्यांनीच आरोपीची बाजू घेणे चुकीचे आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच याबाबत बोलायला हवे. न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहेच, पण राज्य महिला आयोगाने साठेंनी दिलेला अहवाल फेटाळावा. ज्यांना आम्ही नायक समजतो त्यांनी खलनायक बनू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

स्वाती साठेंचे निलंबन करा – धनंजय मुंडे
स्वाती साठे यांनी ‘महाराष्ट्र कारागृह’ या व्हॉट्सअॅप गुपमध्ये अटकेत असलेल्या सहा महिला पोलिसांना भक्कम आधार देण्याचे आवाहन अन्य पोलीस अधिकाऱ्यांना केले आहे. मंजुळा यांच्या खुनात त्यांचाही समावेश असण्याची शक्यता असून त्यांनी पुरावेदेखील नष्ट केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुरावे नष्ट करणे, तपासात अडथळे आणणे हे गुन्हे दाखल करावेत. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या