मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण : खोटा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांना निलंबित करणार!

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळ्य़ातील महिला तुरुंगात झालेल्या मारहाणीतच मंजुळा शेट्य़े हिचा मृत्यू झाला. मंजुळाच्या हत्येप्रकरणी अहवाल देताना जर आकस्मिकता (कॅज्युलिटी) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या वर्तक्यात कुचराई केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.

मंजुळा शेट्य़े हत्येप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. जयंत पाटील, अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदींनी या चर्चेत सहभाग घेतला होता. या चर्चेला उत्तर देताना डॉ. रणजीत पाटील बोलत होते. मंजुळा शेट्य़ेचा मृत्यू मारहाणीने झाला असून तिच्या शरीराकर १७ जखमा होत्या. शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असे पाटील यांनी सांगितले. प्राथमिक अहवालानुसार याप्रकरणी महिला तुरुंगाधिकारी, अधीक्षक तसेच पाच महिला शिपाई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगामार्फत सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कैद्यांचा आहार वाढवणार
प्रत्येक कैद्याला त्याच्या गरजेनुसार योग्य उष्मांकाचा आहार देण्यात येणार असून कैदीनिहाय आहाराकर होणारा दैनंदिन खर्च वाढविण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना वाचवण्यासाठी वर्गणी करून पैसे गोळा करण्याचा संदेश पसरवणाऱ्या व्यक्तीकर सायबर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

इंद्राणीचे मेडीक्युअर, पेडीक्युअर
भायखळा कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडीक्युअर, फेशियल अशा सुविधा घेत होत्या. ही बाब गंभीर असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली. तेव्हा इंद्राणी मुखर्जी यांना जेलमध्ये पुरविण्यात येणाऱ्या विशेष सुविधांबद्दल तपासून कारवाई करण्यात येईल, असेही रणजीत पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या