मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले, दोन डबे वेगळे झाले

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले आणि दोन डबे वेगळे झाल्याने मोठा गोंधळ उडाला. आज पहाटे कसाराजवळ ही घटना घडली. एक्स्प्रेसचे 4 आणि 5 क्रमांकाचे डबे एकमेकांपासून वेगळे झाले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने येणारी मनमाड-मुंबई पंटवटी एक्स्प्रेस कसारा स्थानकातून सकाळी 8.36 वाजता रवाना झाली. स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच एक्स्प्रेसचे दोन डबे एकमेकांपासून विलग झाले.

रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहचून कुशलतेने तांत्रिक दुरुस्ती करत 9.17 वाजता रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणली. यानंतर 9.18 वाजता एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचारी, वकिल यांच्यासह अन्य प्रवाशांची गैरसोय झाली.