मनमोहन सिंग माझे चांगले मित्र – ओबामा

178

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आवडतात. हिंदुस्थानातील प्रशासकीय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचे काम ते करत आहेत. पण माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देखील माझे चांगले मित्र आहेत, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.

बराक ओबामा हिंदुस्थान दौऱयावर आले आहेत. एका इंग्रजी दैनिकाच्या कार्यक्रमात ओबामा यांचे भाषण झाले. त्यानंतर ३०० यंग लिडर्सबरोबर त्यांचा संवादही झाला. राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत दोन वेळा ओबामा हिंदुस्थान दौऱयावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘माझे मित्र बराक’ असा उल्लेख केला होता. याबाबत ओबामांना विचारले असता ते म्हणाले, मला मोदी आवडतात. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी ते मेहनत घेत आहेत. पण डॉ. मनमोहन सिंग हे देखील माझे चांगले मित्र आहेत. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचा पाया मनमोहन सिंग यांनी घातला. २००८-०९मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळात मनमोहन सिंग यांची खूप मदत झाली होती. हिंदुस्थान आणि अमेरिका एकत्र आल्यास जगातील कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येईल असे त्यांनी सांगितले.

धर्माच्या आधारे देशाचे विभाजन नको
मी पंतप्रधान मोदींना पर्सनली सांगितले होते की, धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन होऊ देऊ नका. हा संदेश सर्वांसाठीच आहे, असे ओबामा म्हणाले. हिंदुस्थानातील बहुसंख्याक आणि सरकारने एकत्र येऊन अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना पुढे आणले पाहिजे. हिंदुस्थानातील मुस्लिमांची ओळख हिंदुस्थानी नागरिक म्हणून जगभर असून, ही आनंदाची बाब आहे. इतर देशांमध्ये अल्पसंख्याकांना अशी ओळख मिळत नाही, असे त्यांनी सांगितले.

डाळ, खिमा बनवता येतो
यावेळी ओबामा यांनी दाळ बनवण्याची रेसिपी माहीत असणारा मी एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असल्याचे नर्मविनोदी शैलीत सांगितले. खिमाही मला तयार करता येतो पण चपाती जमत नाही असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या