मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची वाट लावली, माजी पंतप्रधानांची टीका

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची पार वाट लावली असे सांगतानाच भाजप आणि पीडीपी यांच्या युतीने कश्मीर कधी नव्हते इतके अस्थिर करून टाकले आहे अशी तोफ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज डागली. ते काँग्रेसच्या महाअधिवेशनात बोलत होते.

मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय अविचारी तर जीएसटी अंमलबजावणीचा निर्णय आततायी होता. त्यांच्या त्या दोन्ही निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची पुरेपूर वाटच लागली असे त्यांनी सांगितले. डॉ. सिंग पुढे म्हणाले की, जम्मू-कश्मीरमधली परिस्थिती दिवसेंदिवस विकोपाला चालली आहे. तिथे सीमेपलीकडील दहशतवादी कारवायाच नव्हे तर राज्यातील दहशतवादी कारवायासुद्धा वाढल्या आहेत, पण मोदी सरकार त्यावर तोडगा काढू शकलेले नाही.

मोदी यांनी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचा शब्द देशातील तरुणांना दिला होता, पण त्यांनी दोन लाख रोजगार निर्माण केल्याचेही आमच्या ऐकण्यात नाही असे सांगून सिंग म्हणाले की, पंतप्रधानांचे ते आश्वासन म्हणजे कधीही प्रत्यक्षात न उतरणारा एक ‘जुमला’च होता. तरुणांसाठी रोजगारासोबतच मोदी यांनी शेतकऱयांना त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवून देण्याचा शब्द दिला होता, पण तसे करण्यासाठी कृषी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर १२ टक्के असला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत तशी कल्पनाही करता येणार नाही असे डॉ. सिंग यांनी निदर्शनास आणून दिले.

जम्मू-कश्मीरचा प्रश्न मोदी सरकारला हाताळता आलेला नाही. त्यातच कश्मीरमध्ये तर सध्या असे सरकार आहे की तिथे प्रशासनाची दोन अंगे एकमेकांविरोधात काम करताहेत. उजवा हात करतोय ते डाव्या हाताला कळत नाही.
– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

आपली प्रतिक्रिया द्या