पर्रीकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, उद्या शक्तिपरीक्षा

46

सामना ऑनलाईन, पणजी/नवी दिल्ली

गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकरांबरोबरच इतर नऊ मंत्र्यांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्रीकर यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला आहे. गुरुवारी त्यांना शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागेल.

पर्रीकर यांच्या सरकारला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आणि दोन अपक्षांचा पाठिंबा आहे. गोव्यात भाजपचे १३ आमदार आहेत. मनोहर पर्रीकर यांनी कोकणी भाषेतून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर भाजपचे मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मडकईकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मगोपचे नेते सुदिन ढवळीकर, मनोहर आजगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, विनोद पालेकर, जयेश साळगावकर, अपक्ष आमदार गोविंद गावडे, अपक्ष आमदार रोहन खौंटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह भाजपचे तीन मंत्री, मगोपचे दोन, गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आणि दोन अपक्षांना मंत्रीपद दिले आहे. या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष अमित शहा आदी उपस्थित होते.

शपथविधी रोखण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

काँग्रेस पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी तत्काळ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी गोव्यात काँग्रेस हा १७ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष असतानाही राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला का बोलाविले नाही, असा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेस पक्षाने पर्रीकरांचा शपथविधी रोखावा, अशी मागणी आज सर्वोच्च न्यायालयात केली. काँग्रेसची ही मागणी सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक आमदार आहेत तर तुम्ही आधीच सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? तुम्हाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे याचिकेत का नमूद केले नाही? राज्यपालांची भेट घेऊन आपले म्हणणे का मांडले नाही? असे अनेक सवाल न्यायालयाने उपस्थित केले. कुठल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करायचे, याचा विशेषाधिकार राज्यपालांना आहे. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे पर्रीकरांच्या शपथविधीला स्थगिती देता येणार नाही.

शपथ घेताना पर्रीकर चुकले

पर्रीकर शपथ घेताना चुकले आणि चक्क मुख्यमंत्री हा शब्दच विसरले. या शपथविधी सोहळ्यात हजर असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात ही चूक आली. गडकरी तत्काळ उभे राहिले आणि तुम्ही फक्त मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, याची आठवण करून दिली. त्यानंतर पुन्हा पर्रीकरांनी मुख्यमंत्री शब्द वापरून शपथ घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या