‘वॉटरशेडस् अवर’ नियम लागू करा!

>>मनोहर विश्वासराव<<

दूरचित्रवाहिन्यांच्या ब्रेकमध्ये दाखवण्यात येणाऱ्या निरोधच्या जाहिराती वादग्रस्त ठरत आहेत. या जाहिराती खासकरून कौटुंबिक मालिकांच्या कमर्शियल ब्रेकमध्ये सतत दाखवल्या जातात. इतकेच नाही तर लहान मुलांच्या आवडत्या कार्यक्रमांमध्येही त्या दाखवल्या जातात. पण लहान मुलांचा या विषयाशी काहीही संबंध नसल्यामुळे, अशा जाहिराती लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. तसेच याआधीही एका बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. पण बंदी घालूनही अश्लील जाहिरातींचे प्रसारण सुरूच राहिले. तसेच ‘बिग बॉस शो’ दरम्यान निरोधची जाहिरात दाखवण्यास शोचा सूत्रधार अभिनेता सलमान खान यानेही विरोध केला होता. पण विरोध करूनही जाहिरातींचे प्रसारण सर्रास सुरूच होते. अशा जाहिरातीमुळे लहान मुलांच्या मनावर दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रेक्षकांनी ‘ऍडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया’कडे केल्याने त्यांच्या प्रसारण वेळेत बदल करण्याची मागणी कौन्सिलने माहिती व प्रसारण खात्याकडे केली आहे. तेव्हा लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत प्रौढ प्रेक्षकांसाठीच्या जाहिराती या रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत दाखवण्याची सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत. प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाचे देशवासीयांकडून स्वागत केले जात आहे. निरोधची जाहिरात दाखवण्यावर आक्षेप नसून, त्या जाहिराती कोणत्या वेळेत प्रसारित कराव्यात याबाबत योग्य धोरण नसल्यामुळे बहुतांश जाहिरात प्रसारण मालिकांच्या ब्रेकमध्येच होते असे मत ऍडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाच्या महासचिव श्वेता पुरंदरे यांनी मांडले आहे. तेव्हा जाहिरात प्रसारणाच्या बाबतीत जागतिक पातळीवरील ‘वॉटरशेडस् अवर’ या नियमांचा अवलंब देशात करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला केल्या आहेत. या नियमामुळे जाहिरातींमधील आक्षेप व त्याचे दुष्परिणाम पाहून अशा जाहिरातींच्या प्रसारण वेळा निश्चित करता येतील. एकीकडे वॉटरशेड अवर नियमांचा जगभरातील अनेक देशांनी अवलंब केला आहे. पण आपल्या देशात हे नियम लागू करण्याच्या आता कुठे सूचना केल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या