आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची संधी होती, पण ज्यांना मराठ्यांनी सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेले, त्यांनीच मराठ्यांचा घात केला आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक मराठा समाजासाठी पर्वणीच असून मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करून फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मराठा आरक्षणावर निर्णय घेऊ शकत होते. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठाद्वेष आडवा आला, असा आरोप जरांगे यांनी केला. ज्यांनी मराठ्यांची फसवणूक केली, त्यांची या निवडणुकीत जिरवण्यासाठी मराठा समाजाने उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. ही लढाई मराठ्यांच्या प्रतिष्ठेची तसेच अस्मितेची आहे, असेही जरांगे म्हणाले.