सत्तेत अनेक वर्षे मराठे आमदार, मंत्री काम करत असताना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा मंत्री आमदारांना काम न देता मराठ्यांच्या अंगावर मराठेच घालण्याचे काम करून मराठा समाजाला फडणवीस वेगळी वागणूक देत असून, द्वेष करत असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. मनोज जरांगे राजगुरूनगर येथे आले होते. आज भीमाशंकरकडे जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुका मराठा आंदोलन समन्वयक माजी सभापती अंकुश राक्षे, माजी नगरसेवक शंकर राक्षे यांच्यासह तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस आमचे विरोधक, शत्रू नसले तरी त्यांचा मराठ्यांबाबत द्वेष दिसून येत आहे. फडणवीस मराठा आरक्षण विरोधी आहे. मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे. गाडी बिघडल्यानंतर फिटरशिवाय दुरुस्त होत नाही. तसेच मुख्य फिटरशिवाय या सरकारची गाडी चालत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठ्यांचे आरक्षण द्यायचे की नाही द्यायचे हे देवेंद्र फडणवीस सरकार कर्तव्यदक्ष असून, आमच्याच जनतेचे पैसे घेऊन आम्हाला परत देत आहे. मराठा बांधवांना आरक्षण देता येत नसेल तर आम्ही तुमच्याविरोधी बोलल्याशिवाय राहणार नाही. मला राजकारणात न जाता समाजासोबत जायचे आहे. पण मराठा आरक्षण मिळाले नाही तर मी राजकारणावर बोलणारच, असा इशारा जरांगे यांनी दिला.
सरकारची लाडकी बहीण योजना चांगली असली तरी बहिणीच्या मुलांना आरक्षण कधी देणार? असा सवाल करत लोकांना आयुष्यभरासाठी सुविधा द्या? आमचे पैसे घेऊन परत आम्हालाच देता ना? असा सवालही जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला.
■ सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत आमची भूमिका पाहायची होती. निवडणुका त्यांनी पुढं ढकलल्यामुळे आमचा निर्णय पुढं ढकलला आहे.
■ विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने यांना ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवून देणार.
■ विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार, मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचणार नाहीत.