सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हे एकच आहेत. त्यासंबंधीचा कायदा आणि सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला देणारे बनविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरावावे लागेल, अशी खणखणीत भूमिका आज रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. मात्र आपण निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील संवाद दौर्‍यानिमित्त राज्यभर दौरा करीत आहेत. मराठवाड्यात दौरा सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, आज रविवारी त्यांनी मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावे, यासाठीच आपण उपोषण, आंदोलन करीत आहोत. राज्यातील सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंडे बंधू – भगिनीविषयी प्रश्न उपस्थित झाला असता जरांगे पाटील म्हणाले, मराठा आणि वंजारी समाजात कधीच काही झाले नाही. मराठे विरोधात असते तर अनेक मराठे त्यांच्या बाजूने उभे राहिले नसते. त्यांचे कार्यकर्ते चुकीची भूमिका घेतात. त्याचा परिणाम नेत्यांना भोगावा लागतो. त्यामुळे मी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत आणि ते आपले नाव घेतील. असा टोला त्यांनी नामोल्लेख टाळून धनंजय मुंडे यांना लगावला.

ज्यांना पाडायचे त्यांना पाडा
आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे ते आरक्षणापासून आपले ध्येय हटवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे समाजाने सावध राहावे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. आतापर्यंत निवडणुकीत समाजाने जशी एकजूट दाखवली त्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातील निवडणुकीतही ती कायम ठेवून ज्यांना पाडायचे त्यांना पाडा आणि ज्यांना विजयी कराचे त्यांना करा, असे आवाहनही त्यांनी समाजाला केले.