मनोज मेहतांचा सुलटा चष्मा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

मनाने दूर गेलेल्या लोकांना हसतमुखाने काही क्षणांसाठी जवळ आणण्याचे काम सध्या `कॅमेरा’ करत आहे. तो आता सगळ्यांच्या हाती आलेला असला, तरी त्यातून नेमके काय टिपायचे हे तंत्र अवगत असते, ते फक्त छायाचित्रकाराला! अशीच आठवणींची साठवण करून देणारे डोंबिवलीचे छायाचित्रकार मनोज मेहता. नुकतीच त्यांनी छायाचित्रण क्षेत्रात ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. ह्या कलाक्षेत्राचा अनुभव त्यांच्या चष्म्यातून!

इयत्ता पहिलीत असताना मुलाला वडिलांनी सहलीत फोटो काढण्यासाठी कॅमेरा द्यावा, चिमुकल्या हातांनी छायाचित्रे काढावीत आणि मुख्याध्यापकांनी कौतुकाने ती शाळेच्या सूचना फलकावर लावावीत व खाली नाव द्यावे, `छाया: मनोज मेहता!’ बालवयात मिळालेली कौतुकाची थाप एका कलाकाराचे आयुष्य घडवून गेली. त्यांचे नाव छायाचित्रकार मनोज मेहता.

manoj-mehata-2

मूळचे सोलापूरचे मेहता कुटुंबीय अनेक वर्षांपासून डोंबिवलीकर झाले. डोंबिवलीच्या सुसंस्कृत वातावरणात घडण झाल्यामुळे मेहता कुटुंबिय एकवेळ गुजराथी तुटक बोलतील, पण मराठी भाषा अस्खलित बोलतात. मनोज मेहतांचे वडील कैलासभाई मेहता, हे डोंबिवलीतील नामी व्यक्तिमत्त्व. व्यवसायाने वकील असूनही अनेक सामाजिक कामांमध्ये ते पुढे असत. त्यांना छायाचित्रणाची आवड असल्याने त्यांनी घरी कॅमेरा आणला होता. मनोज मेहतांचा १८ वर्षांनी मोठा असलेला भाऊ क्रांतीभाई छायाचित्रणाच्या क्षेत्रात पूर्णवेळ उतरला होता. छोट्या मनोजवर कळत-नकळत ह्या व्यवसायाचे संस्कार होऊ लागले. सुट्टीच्या दिवसांत लग्न समारंभाच्या ठिकाणी क्रांतीभाई मनोजला सोबत नेऊ लागले. भाऊ छायाचित्रण करत असताना मनोज बारकाईने त्यांचे निरीक्षण करत असे. समारंभातील आकर्षक घटना आपल्या डोळ्यांमध्ये कैद करत असे. ह्या सरावाने छोट्या मनोजला कॅमेऱ्याची ओढ वाटू लागली.

सातवीत असताना एकदा त्याने भावाशी खोटे बोलून घरातून लपवून कॅमेरा नेत मित्राच्या वाढदिवसाला फोटो काढले. त्यांची स्वत:ची फोटो लॅब होती. भावाने तो रोल धुतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की घरातल्या शेंडेफळाच्या हातीदेखील छायाचित्रणाचे कौशल्य उतरले आहे. तेव्हापासून ते छायाचित्रणाच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मनोजला `जर्मन रोलीफ्लेक्स मिडियम फॉर्मट कॅमेरा’ देऊ लागले. त्या एका अनुभवावर मनोजने पहिली बारशाची ऑर्डर घेतली आणि यशस्वीपणे तो पहिले युद्ध जिंकून आला. तेव्हापासून हे छोटे छायाचित्रकार लग्न, मुंज, समारंभाच्या ऑर्डरला जाऊ लागले. ह्या कलेचा एवढा छंद जडला, की आपणही पूर्णवेळ ह्याच क्षेत्रात उतरायचे असे त्याने बालवयात ठरवून टाकले. आपल्याला अनुभवातून मिळालेले ज्ञान आयुष्यभर कामी आले, असे मेहता सांगतात.

सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा, काव्य संमेलने, खेळांचे सामने, घरगुती समारंभ आणि अन्य कोणतेही उत्सव असले की ह्या मेहता बंधूंची जोडगोळी उपस्थित असे. दोघांनी मिळून रंगीत छायाचित्रे डेव्हलप करण्याची पद्धतही विकसित केली होती. त्यासुमारास मुंबईत कोडॅक कंपनी आणि अन्य २-४ छायाचित्रकार रंगीत छायाचित्रे देऊ शकत होते, तर डोंबिवलीत मेहता बंधू. मात्र मेहता बंधूंनी विकसित केलेली पद्धत ही, स्वयंचलित पद्धतीतही सरस होती, अनेक प्रयोगांतून साकारलेली होती, त्यामुळे तिचे परिणाम इतरांच्या रंगीत छायाचित्रांच्या तुलनेत `सरस’ होते. हा फरक `कोडॅक’वाल्यांनाही जाणवला आणि त्यांनी आपल्याकडच्या ऑर्डर पूर्ण करण्याचे काम मेहता बंधूंकडे सोपवले. ह्या दोघांची खासियत म्हणजे लग्नसमारंभात सकाळी काढलेले फोटो संध्याकाळी स्वागतसमारंभात अल्बम स्वरूपात यजमानाच्या हाती सोपवत असत. लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करतानाही आपले वेगळेपण अबाधित ठेवून त्यांनी सरधोपट पार्श्वसंगीत न वापरता गाण्यांचा, शब्दांचा, संगीताचा बारकाईने अभ्यास करून विविध प्रयोग केले. प्रसंगी कवींकडून गाणी लिहून घेत आणि नामवंत गायकांकडून ती गाऊन घेत असत. अल्बमच्या सजावटीत त्यांचा सुरुवातीपासूनच हातखंडा होता, आताही आहे. म्हणून त्यांचे अनेक ग्राहक आजही त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्याशी मेहता कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत. अमराठी लग्नांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थार्जनाची संधी असूनही मेहता मराठी लग्नसमारंभांच्याच ऑर्डर घेतात. मराठी संस्कृती,संस्कार आणि भाषा याबद्दल असलेली आपुलकी, हे त्यामागचे एकमेव कारण आहे, असे ते सांगतात.

मनोज मेहतांनी आपल्या बोलक्या स्वभावाने आजवर असंख्य माणसे जोडली. `चीझ’, `स्माईल’, `हसा’, `रेडी’ हे छायाचित्रकारांचे परवलीचे शब्द मेहतांच्या तोंडी कधीच येत नाहीत. कारण अशी कृत्रिम छायाचित्रकारिता करण्यात त्यांना अजिबात रस नाही. लोकांशी बोलून, त्यांना खुलवून वातावरणात सहजता आली, की त्यांच्या नकळत मेहता खुबीने त्यांच्या भावमुद्रा आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतात. आजची ही `कँडिड’ फोटोग्राफीची शैली त्यांनी फार पूर्वीच विकसित केली. त्यांच्या प्रत्येक छायाचित्रात ती सहजता आणि प्रसन्नता दिसते. उदास क्षण ही कैद करून ठेवण्याची गोष्ट नाही, आयुष्यातही नाही आणि कॅमेऱ्यातही नाही, असे ते सांगतात. त्यानुसार त्यांची आजवरची सगळी बोलकी छायाचित्रे सकारात्मक ऊर्जा देतात.

मेहता ह्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची, एकांकिकांची आवड होती. काही नाटकांतून त्यांनी कामही केले. अभिनयाची जाण असल्यामुळे नाटकांतील अनेक भावमुद्रा ते अचूक टिपत असत. तसेच शिवानंद प्रतिष्ठानच्या अनेक मैफिलींमध्ये छायाचित्रण केल्याने त्यांच्यातील कानसेनही जागा झाला. शब्द आणि स्वरांशी गट्टी जमली. गायकाच्या गाण्याबरोबर त्यांचा `क्लिक’ समेवर पडू लागला. रसिकांची गायकाला दाद, तर गायकाची मेहतांना दाद मिळू लागली. सर्वसामान्य लोकांबरोबरच अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळींशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. पु.भा.भावे, शं. ना. नवरे, विनय आपटे, सुधीर फडके, प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ, गजाननराव पेंढारकर, दत्तात्रय म्हैसकर, आचार्य केमिकलचे आनंद आचार्य, प्रदीप भिडे ह्यांचा दीर्घ सहवास मेहतांना लाभला.

पक्ष्याला बघायचे की त्याच्या डोळ्याला, हे ज्याला कळते तो आपल्या क्षेत्रात अर्जुन होतो. हेच कौशल्य अवगत झाले होते मनोज मेहता ह्यांना! त्यांनी काढलेली छायाचित्रे आपल्याला तासनतास चित्राचे निरीक्षण करायला भाग पाडतात. `सहजता’ हे त्यांच्या छायाचित्राचे बलस्थान आहे. आपल्याला नेमके काय टिपायचे आहे, त्याचा ते सखोल विचार करतात. एकदा दिवाळीत डोंबिवलीच्या `सुरेंद्र वाजपेयी क्रिडा संकुलात’ काढलेली १०० फूट रांगोळी एका क्लिकमध्ये कैद करण्यासाठी ह्या अवलियाने १०० फूट उंचावरून कॅमेऱ्याचा अँगल धरला आणि जीवाची जोखिम पत्करून हवा तसा फोटो मिळवला, जो महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात पहिल्या पानावर आठ कॉलममध्ये छापून आला होता. ह्याच त्यांच्या `हटके’शैलीमुळे त्यांनी आजवर अनेक वृत्तपत्रांसाठी छायाचित्रण केले, लेखन केले. लंडन, सिंगापुर येथे मिफ्ता (अॅवॉर्ड)च्या छायाचित्रणासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. निसर्गाचे, प्राण्यांचे छायाचित्रण करण्याकडे त्यांचा कधीही कल नव्हता. पण जेवढे त्यांचे चित्रण केले, त्यालाही `मेहता’ टच होता.

manoj-mehata-3

छायाचित्रणात एवढी वर्षे काम करूनही आपल्या कामात काय उणिवा राहिल्या, याचा ते सातत्याने अभ्यास करत असतात. पत्नी मधुरा आणि मुली केतकी, चैताली ह्यांचा अभिप्राय घेतात. छायाचित्रांची प्रदर्शने बघायला जातात, स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्यांच्या अनेक छायाचित्रांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारही मिळाले आहेत. छायाचित्रण जगातील प्रख्यात व्यक्तिमत्व गौतम राजाध्यक्ष ह्यांच्या हस्तेही त्यांच्या एका छायाचित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

वडिलांप्रमाणेच समाजकार्याची आवड असलेले मेहता कॉलेजात असताना आपल्या मित्रपरिवारासमवेत बाळगोपाळांसाठी `कोवळीक’ (कोवळ्या मनांशी जवळीक) नावाची संस्था चालवत असत. त्यात सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविश्वाशी संबंधित उपक्रम राबवत असत. स्थानिक नवोदित कलाकारांना घेऊन १४ ऑगस्टच्या रात्री `कलारजनी’ आयोजित करून धमाल, मस्ती, गप्पा, गाणी म्हणत स्वातंत्र्य दिनाचे स्वागत करत असत. लायन्स क्लब तसेच अन्य सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय कार्यकर्ता होते. गेल्यावर्षीपासून त्यांनी ३ ते ५ वयोगटातील बोबडकांद्यांसाठी `झंपुला’ नावाची बडबडगीतांची स्पर्धा सुरू केली आहे. ह्या स्पर्धेची प्रेरणा त्यांना नातवंडांकडे बघून मिळाल्याचे ते सांगतात. छायाचित्रणामुळे वेगळे काही टिपण्याची सवय त्यांना लागली आहे. नव्हे, तर अशा गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटतच नाहीत. समाजभान देणारी दृष्टी त्यांना कॅमेऱ्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे समाजातील निष्काम कर्मयोग्यांचा आपण सत्कार करावा ह्या भावनेतून त्यांनी १९९७ पासून आपल्या वडिलांच्या नावे `कैलासभाई मेहता’ पुरस्कार सुरू केला आहे. सलग २१ वर्षे हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडत आहे. मेहता ह्यांनी आजवर ३ गुजराथी आणि २५ मराठी विद्यार्थी घडवले, जे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तम छायाचित्रकार म्हणून नाव कमावत आहेत.

मेहता ह्यांच्या कार्याची दखल घेत रविंद्र चव्हाण ह्यांचा `आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्कार तसेच त्यांच्या शाळेतर्फे`धनाचौधरी बहुद्देशीय विद्यालया’तर्फे यशस्वी उद्योजक व आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले आहे. तसे असले तरीदेखील एक छायाचित्रकार म्हणून आपल्या क्षेत्राची खंत व्यक्त करताना ते म्हणतात, `जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व क्षणांचा साक्षीदार असणाऱ्या छायाचित्रकाराला सरकारी तसेच अन्य नामांकित पुरस्कारांतून सपशेल वगळले जाते. गौतम राजाध्यक्ष ह्यांच्यासारख्या कलावंताला `महाराष्ट्र भूषण’ दिला जात नाही, तिथे आमची काय कथा?’

मेहतांनी व्यक्त केलेली खंत योग्य असली, तरी आज मेहतांनी जोडलेली माणसे हा त्यांचा खरा पुरस्कार आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या