पत्त्यासाठी थांबवले आणि हस्तमैथून करू लागला, महिला पत्रकाराची पोलिसांत तक्रार

बाईकवरून आलेल्या एका व्यक्तीने तरुणीला पत्ता विचारण्यासाठी थांबवले, ती तरुणी थांबताच या बाईकस्वाराने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे ही तरुणी घाबरली असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार शनिवारी घडला असून तक्रार करणारी तरुणी ही एक पत्रकार आहे.

कर्नाटकातील बनासवाडी परिसरात असलेल्या राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात या महिला पत्रकाराने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने म्हटलंय की शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ती सुपरमार्केटमधून सामान घेऊन घराकडे निघाली होती. OMBR लेआऊट परिसराजवळ ही तरुणी पोहोचली होती तेव्हा तिला एका बाईकस्वाराने थांबवलं त्याने तिला पत्ता विचारला. महिला पत्रकाराने त्याला पत्ता सांगितला. पत्ता ऐकत असताना या बाईकस्वाराचा एक हात खाली होता ते त्यावेळेला आपल्याला कळालं नाही असं या तरुणीने सांगितले. त्याने अचानक पँटची चेन काढली आणि हस्तमैथून करायला लागला असं या तक्रारदार तरूणीने म्हटलेलं आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा करायला सुरुवात केली, यामुळे तो बाईकस्वार तिथून पळून गेला. हा प्रकार घडला तेव्हा त्या परिसरात कोणी नव्हतं असं या तरुणीने सांगितलं आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही दृश्ये तपासायला सुरुवात केली असून त्यातून त्यांना आरोपीबाबतचे काही धागेदोरे सापडले आहेत. हा आरोपी लवकरच अटक केला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या