मनोरा आमदार निवास दुरुस्तीची अधीक्षक अभियंत्यामार्फत चौकशी

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

मनोरा आमदार निवासातील खोल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या घोटाळय़ावर सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवला. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी अधीक्षक अभियंत्यामार्फत चौकशी करण्यात येत असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

औचित्याच्या मुद्दय़ाअंतर्गत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा चर्चेला आणला. मनोरा आमदार निवास दुरुस्ती घोटाळा हा अत्यंत मोठा असल्याचे सांगत आमदारांच्या निवासात असा प्रकार करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत कशी होते, असे सांगत अधिकारी इतके बेशरम आणि नालायक झालेत असे म्हटले. चौकशीसाठी आमदारांची चौकशी नेमावी अशी मागणी त्यांनी केली.

कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना सरकार पाठीशी घालतेय

आमदार निवासस्थानातील खोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीत झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळय़ावरून विधानसभेत वादळी चर्चा झाली. आमदारांच्या खोटय़ा सह्या करून झालेल्या भ्रष्टाचारात प्रमुख दोषी असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी आमदारांची सर्वपक्षीय चौकाशी समिती नेमण्याची तसेच फौजदारी गुन्हा दाखल मागणी करण्यात आली.

लक्षवेधी लागू न देण्यासाठी दबाव

काँग्रेस आमदार विरेंद्र जगताप यांनीही मनोऱयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या नागपूरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्या असून ही लक्षवेधी लागू देणार नाही अशी भाषा करण्याची हिंमत या महिलेने दाखवली. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱयांना सरकार किती संरक्षण देणार, असा सवाल जगताप यांनी केला.

स्वतंत्र एफआयआर दाखल करा

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर अधीक्षक अभियंत्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. याप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी सरकारकडे येण्याची गरज नाही. आमदार स्वतंत्रपणे एफआयआर दाखल करू शकतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या