मनुष्यबळ विकासमंत्र्यांना सहा तास विद्यापीठात रोखले, जेएनयूचे विद्यार्थी रस्त्यावर

809

शुल्कवाढीसह विविध मुद्दय़ांवरून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी सोमवारी दीक्षांत समारंभावेळी रस्त्यावर उतरून तीक्र निदर्शने केली. शुल्क कमी केल्याशिवाय हा समारंभ होऊच देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तसेच अधिक पोलीस फौजफाटा मागवून निदर्शनकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा फवाराही केला.

शुल्कवाढीबरोबरच विद्यापीठ आवाराच्या बाहेर दीक्षांत समारंभ आयोजित करण्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. या समारंभाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल हजर होते. याचदरम्यान सकाळी 8 वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विद्यार्थी जमले. तेथून दीक्षांत समारंभाच्या ठिकाणापर्यंत मोर्चा नेण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोखरियाल यांना तब्बल सहा तास विद्यापीठात रोखून धरले. आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एआयएसएफ आणि एसएफआय आदी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. आम्ही 15 दिवसांपासून शुल्क कमी करण्याची मागणी करतोय. मात्र विद्यापीठाने या मागणीला न जुमानल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली, असे एका विद्यार्थी प्रतिनिधीने सांगितले.

कमी जागेचे कारण देत समारंभ विद्यापीठाबाहेर

कॅम्पसच्या ऑडिटोरियममध्ये कमी जागा असल्याचे कारण देत जेएनयू प्रशासनाने दीक्षांत समारंभ विद्यापीठाबाहेर वसंत कुंजमध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित केला. जेएनयूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दीक्षांत समारंभात जवळपास 460 विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठाच्या कोणत्याही ऑडिटोरियममध्ये 300 पेक्षा अधिक आसने नसल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या