ऍण्टेलियाशेजारी स्फोटक ठेवण्याच्या कटात मनसुख हिरेनचाही सहभाग, एनआयएची कोर्टात माहिती

‘अॅण्टेलिया’जवळ स्पह्टकांची स्कॉर्पिओ कार पार्क करण्याच्या कटात मनसुख हिरेन हादेखील सहभागी होता. त्यामुळेच हिरेन यांना आपला जीव गमवावा लागला असा दावा एनआयएने बुधवारी विशेष कोर्टात केला. असे सर्व करण्यामागे मोठा आर्थिक हेतू असल्याची दाट शक्यता असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले. त्यामुळे वाझे याच्या एनआयए कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत कोठडीची मुदत वाढवली. तर विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

‘अॅण्टेलिया’ स्पह्टक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिन वाझे याची एनआयए कोठडीची मुदत संपल्याने त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. ‘यूएपीए’ कायद्यातील तरतुदीनुसार आरोपीची 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची मागणी एनआयएच्या वतीने एसजी अनिल सिंह यांनी कोर्टाकडे केली. त्यानुसार कोर्टाने वाझे याची आणखी दोन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे. तसेच त्याला योग्य वैद्यकीय सुविधा द्या. पुढील सुनावणीवेळेस वाझेच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशदेखील यावेळी तपास यंत्रणेला देण्यात आले. दरम्यान, वाझेसह या प्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या अधिक कोठडीची आवश्यकता नसल्याचे एनआयएने कोर्टाला सांगितले. त्यामुळे कोर्टाने दोघांना 14 दिवसांची कोठडी सुनावत 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

सीबीआयला वाझेची चौकशी करण्याची परवानगी
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनी 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी सचिन वाझे याची चौकशी करण्यास सीबीआयला कोर्टाने परवानगी दिली आहे. सीबीआयने बुधवारी एनआयए कोर्टात परवानगी मिळावी यासाठी रीतसर अर्ज केला होता. त्यानुसार आता एनआयए कोठडीतच सीबीआय परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची वाझेकडे चौकशी करणार आहे. याकरिता लागणाऱया वेळा दोन्ही तपास यंत्रणांनी आपापल्या परीने ठरवाव्यात असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

वाझेकडे एवढा पैसा आला कुठून
वाझे याने अन्य आरोपींकडे दिलेली लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा आला कुठून, तो कशासाठी वापरत होता याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे एनआयएच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. दरम्यान, आपल्याला विशिष्ट तुरुंगात पाठविण्याची मागणी विनायक शिंदे याने केली होती. मात्र आरोपीला तुरुंग निवडण्याचा अधिकार नाही. रोस्टरप्रमाणे ज्या तुरुंगासाठी नाव लागेल तिथे पाठवले जाईल असे कोर्टाने स्पष्ट केले.

वाझेचा कोर्टाला पत्र देण्याचा प्रयत्न
सुनावणी संपायच्या वेळी सचिन वाझे याने स्वहस्ताक्षरात लिहिलेले एक पत्र कोर्टाला देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोर्टाने हे पत्र स्वीकारण्यास नकार दिला आणि तुम्हाला काही सांगायचे असेल तर कलम 162 नुसार आरोपींना दिलेल्या नियमानुसार आपल म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या