मंत्रालयातील पाणी शुद्धच, पाण्यात जास्तीचे क्लोरिन पडले

सामना ऑनलाईन, मुंबई

मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलटय़ा, जुलाब, मळमळ अशा आजारांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मंत्रालयातील पाण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु मंत्रालयातील पाणी शुद्धच असल्याची माहिती सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिली. पाण्यात क्लोरिनची मात्रा जास्त झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याचे ते म्हणाले.

मंत्रालयातील पाणी पिण्यालायकच आहे, परंतु एका विंगमधील पाण्यात अधिक प्रमाणात क्लोरिन पडल्यामुळे केवळ याच ठिकाणी पाण्याची समस्या निर्माम झाली होती. हे पाणी प्यायल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उलटय़ा, जुलाब आणि मळमळ अशा आजारांचा सामना करावा लागला. परंतु आता पाण्याचा प्रश्न सोडवला असून मंत्रालयातील पाणी शुद्धच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.